योगायोगाने क्रिकेटपटू झालेल्या स्मृतीची यशोगाथा 

योगायोगाने क्रिकेटपटू झालेल्या स्मृतीची यशोगाथा 

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू चमकतात. ऑस्ट्रेलियात महिलांचीसुद्धा टी-20 लीग आयोजित केली जाते. त्यात हर्मनप्रीत कौर हिच्यानंतर महाराष्ट्राच्या स्मृती मानधना या तरुणीला संधी मिळाली आहे. योगायोगाने क्रिकेट खेळू लागलेल्या स्मृतीची सक्‍सेस स्टोरी प्रेरणादायी ठरते. 

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल या बहुचर्चित लीगमध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा बोलबाला असतो. काही संघांचे नेतृत्वही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी केले. पहिल्या आयपीएलमधील विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाला विजेतेपद मिळवून दिलेल्या शेन वॉर्नचे यासंदर्भात उदाहरण देता येईल. अशा वेळी ऑस्ट्रेलियातील महिलांच्या टी-20 लीगमध्ये भारताच्या क्रिकेटपटूंना पसंती मिळणे नक्कीच लक्षवेधी ठरते. विशेष म्हणजे यातील स्मृती मानधना ही महाराष्ट्राची आहे. हर्मनप्रीत कौरला सिडनी थंडर्सने करारबद्ध केले. त्यानंतर स्मृतीला ब्रिस्बेन हिटने निवडले. या स्पर्धेल वूमन्स बिग बॅश लीग, असे संबोधले जाते. 

स्मृतीने वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भरीव कामगिरी केली. तिने होबार्टमधील सामन्यात शतकी खेळी केली. पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर तिने दोन अर्धशतके काढली. तिने ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंची शाबासकी मिळवली. त्यामुळेच तिला प्राधान्य दिल्याचे ब्रिस्बेन हिटचे प्रशिक्षक अँडी रिचर्डस यांनी म्हटले आहे. 

परदेशी तज्ज्ञाने स्मृतीची प्रशंसा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात स्मृतीने स्विंग गोलंदाजीच्या निर्धाराने सामना केला. त्या वेळी इंग्लंडची कर्णधार शार्लोट एडवर्डस हिने स्मृतीच्या तंत्राचेच नव्हे, तर दृष्टिकोनाचेही कौतुक केले होते. हाच दृष्टिकोन स्मृतीला अशी फळे देत आहे. स्मृतीचे क्रिकेट खेळणे हा निव्वळ योगायोग आहे. संगतीला तिचा भाऊ श्रावण क्रिकेट खेळायचा. वयोगट पातळीवरील त्याची कामगिरी चांगली झाली. त्याचे नाव, फोटो वृत्तपत्रांत छापून यायचे. त्या वेळी स्मृती कात्रण कापून ठेवायची. असेच एके दिवशी दादाच्या बातमीचे कात्रण कापताना तिच्या मनात विचार चमकला. मीसुद्धा क्रिकेट खेळायला हवे आणि अशाच धावा करायला हव्यात. वडील श्रीनिवास यांनी स्मृतीला अडविले नाही. तशी ती वडील-भावाबरोबर मैदानावर जायचीच. तिने खेळायचे ठरविल्यानंतर सुरवातीला तिला 22 यार्डवरून हळूच चेंडू टाकला जायचा. स्मृतीला मात्र ते आवडायचे नाही. मग श्रीनिवास तिला 15 यार्डवरून वेगाने चेंडू टाकू लागले. त्यानंतरही स्मृती चांगले शॉट मारायची. श्रीनिवास यांना डावखुऱ्या फलंदाजांचे आकर्षण असल्यामुळे श्रावण लेफ्टी बॅट्‌समन झाला. एरवी उजवा हात वापरणारी स्मृतीसुद्धा लेफ्टीच बनून खेळू लागली. 

असा योगायोग होऊन क्रिकेटपटू बनलेल्या स्मृतीने सूक्ष्म निरीक्षणशक्ती, गंभीर दृष्टिकोन आणि चिकाटीच्या जोरावर अनेक योग जुळवून आणले. ऑस्ट्रेलियात तिला संधी मिळणे, हा माइलस्टोन ठरला आहे. स्वतः स्मृती याकडे एक शिकण्याची संधी म्हणूनच पाहते. तिने सांगितले, की ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू वेगळ्या पद्धतीने सराव करतात. तंदुरुस्तीसाठी त्यांचे प्रयत्नसुद्धा वेगळे असतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आम्हाला आमच्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक दिसून आला. मला आता हा फरक जाणून घेता येईल. 

या दोन देशांच्या क्रिकेटपटूंमधील कामगिरीत फरक दिसून यायचे मूळ कारण तयारीमध्ये आहे. हे हेरणाऱ्या स्मृतीची परिपक्वता कौतुकास्पद ठरते. मुख्य म्हणजे त्यातून तिची महत्त्वाकांक्षा दिसून येते. भारतीय महिला क्रिकेटची कपील देव मानली जाणारी झुलन गोस्वामी आणि सचिन तेंडुलकरशी तुलना केली जाते, ती मिताली राज यांच्यानंतर नव्या पिढीतील तरुणी आपले अस्तित्व अधोरेखित करत आहेत. त्यात पुण्यासह भारतातील मैदाने गाजविलेल्या स्मृतीची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com