Smriti Mandhana : लाडक्या स्मृतीवर आगपाखड; नेटकऱ्यांनी विराटशी संबंध जोडत दिली नवी पदवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana Trolled

Smriti Mandhana : लाडक्या स्मृतीवर आगपाखड; नेटकऱ्यांनी विराटशी संबंध जोडत दिली नवी पदवी

Smriti Mandhana Trolled : महिला टी 20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 5 धावांनी पराभूत झाला. पुरूष क्रिकेट संघाप्रमाणे महिला क्रिकेट संघला देखील पुन्हा एकदा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत कच खालला. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होऊ लागल्या.

भारताची स्टार आणि स्टायलिश ओपनर स्मृती मानधना ही भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वात जास्त फॉलो केली जाणारी क्रिकेटर आहे. मात्र या स्टार क्रिकेटरला देखील नेटकऱ्यांनी सोडले नाही. आयसीसी स्पर्धेत बाद फेरीत सततच्या पराभवाने वैतागलेल्या चाहत्यांनी स्मृती मानधना मोक्याच्या क्षणी कामगिरी करण्यात अपयशी ठरते असे म्हणत तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

अनेक नेटकऱ्यांनी स्मृती मानधनाला चोकर असे म्हणत ट्रोल केले. काही नेटकऱ्यांनी तर विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्या जर्सी क्रमांकाच्या साधर्म्यावर टीका केली. विराट कोहलीला देखील आयसीसी ट्रॉफी तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले होते.

स्मृती मानधना ही महिला प्रीमियर लीगच्या ऐतिहासिक पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली होती. तिला रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 3.40 कोटी रूपयांना खरेदी केले. यानंतर आरसीबीने विराट कोहलीसारखा ब्रँड महिला प्रीमियर लीगमध्ये देखील शोधला अशी चर्चा सुरू झाली होती. आता भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी आरसीबी, विराट कोहली अन् स्मृती मानधनाला देखील चोकर म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाच्या 173 धावांचे आव्हान पार करताना झुंजार वृत्ती दाखवत 167 धावांपर्यंत मजल मारली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी करत हरमनला चांगली साथ दिली.

मात्र पाचवेळा टी 20 वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. भारताने या सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. याचा मोठा फटका भारताला बसला.

(Sports Latest News)