निवृत्त सोमदेवची आणखी एक "बिनतोड सर्व्हिस' 

पीटीआय
गुरुवार, 19 जानेवारी 2017

टेनिस संघटनेने उदयोन्मुख खेळाडूविषयी इतके कठोर धोरण राबवू नये. 19 वर्षांच्या खेळाडूवरील असे आरोप जाहीररीत्या व्हायला नको होते. संघटनेला यातून नेमके काय साधायचे आहे? 
- सोमदेव देववर्मन, निवृत्त टेनिसपटू 

नवी दिल्ली - अलीकडेच निवृत्त झालेला टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आणखी एक "बिनतोड सर्व्हिस' करत अखिल भारतीय टेनिस संघटनेवर तोफ डागली. सुमीत नागलविरुद्ध जाहीर आरोप करण्यामागे "एआयटीए'चा काय हेतू आहे, असा सवाल त्याने एका पत्राद्वारे उपस्थित केला. 

सुमीतने डेव्हिस करंडक पदार्पणात गुणवत्तेची चुणूक दाखविली होती; पण त्या वेळी "हॅंगओव्हर'मुळे सराव सत्राला दांडी मारल्याबद्दल त्याला वगळण्यात आले. मैत्रिणीच्या उपस्थितीवर संघ व्यवस्थापनाने आक्षेप घेतल्यानंतर सुमीतने अतिमद्यपान केले. हे सगळे तपशील देत संघटनेने कारवाईमागील कारणे जाहीर केली. यावर सोमदेवने खरमरीत पत्रच "एआयटीए'ला पाठविले. त्याने म्हटले आहे, की "हे प्रकरण "एआयटीए'ने फार खराब पद्धतीने हाताळले आहे. संघटना त्याला धडा शिकविण्याचा प्रयत्न करत आहे, की त्याचे उदाहरण बनवत आहे? निवड समितीला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे का? या लढतीसाठी निवड समितीने अनुभवी रोहन बोपण्णाला वगळून केवळ पाच जणांचा संघ निवडला आहे. हा निर्णय खराब आहे.' 

सुमीतचे समर्थन 
सोमदेवने सुमीतचे समर्थन केले. खांद्याला दुखापत झाल्यामुळेच तो फेब्रुवारीतील न्यूझीलंडविरुद्धची लढत खेळू शकणार नाही, असा दावा त्याने केला. संघटनेला खेळाडूंविषयीचे तपशीलसुद्धा माहीत नाहीत, असा दावा त्याने केला. 

Web Title: Somdev unanswerable Service