वॉर्नरच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलिया पराभूत; आफ्रिका 10 धावांनी विजयी

South Africa
South Africa

मॅंचेस्टर : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्डिड वॉर्नर याने स्पर्धेतील तिसरे शतक झळकावूनही ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला असून, आता उपांत्य फेरीत त्यांची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसी याचे शतक आणि रॅसी वॅन डर डुसेन याच्या 95 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 325 अशी भक्कम धावसंख्या उभारली. या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाची खराब सुरवात होऊनही त्यांनी 310 धावांपर्यंत मजल मारली. वॉर्नरने शतक झळकाविले. तर, ऍलेक्स कॅऱीने अर्धशतक झळकाविले.

स्पर्धेतील आव्हान आधीच आटोपल्यानंतर अखेर शेवटच्या लढतीत आफ्रिकेने ही धावसंख्या उभारून थोडी तरी प्रतिष्ठा कमावण्याचा प्रयत्न केला. क्विंटन डिकॉक-एडन मार्करम यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये 73 धावांचा पाऊस पाडला. 12व्या षटकात नेथन लायनने कांगारूंना पहिले यश मिळवून दिले. त्याने मार्करमला बाद केले. क्विंटन 24वे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर परतला. त्यालासुद्धा लायननेच बाद केले. मग फाफने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याला रॅसीकडून तोलामोलाची साथ लाभली. 
फाफने सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. मग त्याने कारकिर्दीतील 12व्या शतकापर्यंत मजल मारली. 93 चेंडूंत त्याने शतक पूर्ण केले. रॅसीच्या साथीत त्याने तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी रचली. रॅसीचे आक्रमण चर्चेचा विषय ठरले. त्याचे हे सातवे अर्धशतक आहे. शतकापासून मात्र तो वंचित राहिला. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. 

दक्षिण आफ्रिकेच्या धावांसमोर ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली. कर्णधार फिंच, स्टिव्ह स्मिथ हे लवकर परतले. तर, उस्मान ख्वाजा जायबंदी झाली. मात्र, तरीही वॉर्नरने आपला सर्वोच्च फॉर्म कायम ठेवताना एक बाजूने धावा केल्या. त्याला यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीने चांगली साथ दिली. पण, अखेरच्या षटकांमध्ये झटपट विकेट गमवाव्या लागल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 310 धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक : 
दक्षिण आफ्रिका ः 50 षटकांत 6 बाद 325 (एडन मार्करम 34-37 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, क्विंटन डिकॉक 52-51 चेंडू, 7 चौकार, फाफ डू प्लेसी 100-94 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, रॅसी वॅन डर डुसेन 95-97 चेंडू, 4 चौकार, 4 षटकार, जेपी ड्युमिनी 14-13 चेंडू, 1 चौकार, मिचेल स्टार्क 9-0-52-2, जेसन बेहरनडॉर्फ 8-0-55-1, नेथन लायन 10-053-2, पॅट कमिन्स 9-0-66-1, ग्लेन मॅक्‍सवेल 10-0-57-0) विजयी वि. 49.5 सर्वबाद 315 (डेव्हिड वॉर्नर 122, ऍलेक्स कॅरी 85, कगिसो रबाडा 3-56)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com