INDvsSA : भारताचा धावांचा डोंगर; आफ्रिकेचे आताच तीन आऊट

Thursday, 3 October 2019

136 षटकांचे क्षेत्ररक्षण करून थकल्या अवस्थेत दक्षिण आफ्रिकेला एक तास फलंदाजी करायला लावली. सामन्याचा दुसरा दिवस संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने  मार्करम आणि डी ब्रुईनची महत्त्वाची विकेट गमावून 3 बाद 39 धावसंख्या जमा केली.

विशाखापट्टणम : मयांक आगरवाल ( 215 धावा ) आणि रोहित शर्मा (176 धावा) यांनी सलामीला रचलेल्या त्रिशतकी भागीदारीमुळे भारतीय संघाला विशाखापट्टणम कसोटी सामन्यात 7 बाद 502 चा डोंगर उभारता आला. 136 षटकांचे क्षेत्ररक्षण करून थकल्या अवस्थेत दक्षिण आफ्रिकेला एक तास फलंदाजी करायला लावली. सामन्याचा दुसरा दिवस संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने  मार्करम आणि डी ब्रुईनची महत्त्वाची विकेट गमावून 3 बाद 39 धावसंख्या जमा केली. सामन्याच्या दुसर्‍याच दिवशी भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

दोन वर्ष, दोन सामने, दोन द्विशतकं.. मयांकचा स्वप्नवत प्रवास!

सामन्याच्या दुसर्‍या दिवशी चांगल्या हवामानात खेळ चालू झाल्यावर मयांक आगरवाल आणि रोहित शर्माने गोलंदाजांचा परत एकदा समाचार घेणे चालू केले. फिरकी गोलंदाजांनी टाकलेल्या बर्‍याच  षटकात दोन चौकार मारले जात होते. दोघेही फलंदाज हवेतून फटके मारताना सहजता दाखवत होते. पहिली विकेट पडत नाही बघून फाफ डू प्लेसीने डाव्या बाजूला 7 क्षेत्ररक्षक उभे करून धावा रोखायचा प्रयत्न केला. लेग स्टंप बाहेर पडलेल्या चेंडूंना कधी स्वीपचा फटका तर कधी रिव्हर्स स्वीप मारून मयांक आगरवाल रोहित शर्माने वेगाने धावा जमा केल्या.

मयांक आगरवालचे कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक पूर्ण झाले. उपहाराला काही मिनिटे बाकी असताना रोहित शर्मा 176 धावा काढून केशव महाराजला बाद झाला. दोघांनी रचलेली 317 धावांची भागीदारी भारत वि दक्षिण आफ्रिका मालिकेतील विक्रमी भागीदारी ठरली. उपहारानंतर चेतेश्वर पुजाराला दुसर्‍या नव्या चेंडूवर फिलँडरने बोल्ड केले. कप्तान विराट कोहली सेनुरन मुथुस्वामीच्या टप्पा पडल्यावर खूप हळुवार वळलेल्या चेंडूवर अंदाज चुकल्याने झेलबाद झाला. दबाव असताना सुंदर फलंदाजी करणारा अजिंक्य रहाणे धावांचे ताट वाढले असताना जेवण करायचे सोडून बाद का होतो हे कोडे कायम राहिले.

या कशाचाच मयांक आगरवालवर परिणाम होत नव्हता. मयांक फिरकी गोलंदाजांवर हल्ला चढवत द्विशतकी मजल मारून गेला. 23 चौकार आणि 6 षटकार मारून 215 धावा काढणारा मयांक आगरवाल बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला अभिवादन केले. विशाखापट्टणमचे प्रेक्षक ‘लोकल बॉय’ हनुमा विहारी फलंदाजीला येईल या अपेक्षेने टाळ्या वाजवू लागले असताना संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठवले.

INDvsSA : पहिली नाही ही तर मयांकची तिसरी द्विशतकी खेळी

चहापानानंतऱ हाणामारीच्या प्रयत्नात विहारी झेल देऊन बाद झाला. अखेर 7 बाद502 धावसंख्येवर विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. केशव महाराजने 55 षटके टाकून 189 धावा देत 3  फलंदाजांना बाद केले. थकल्या अवस्थेत 20 षटकांचा सामना करताना दक्षिण आफ्रिकेने एडियन मार्करम आणि डी ब्रुईनची मोलाची विकेट गमावली जेव्हा अश्विनने भन्नाट ऑफ स्पीन टाकून त्याची मधली यष्टी हलवली. दुसर्‍या दिवशीचा खेळ संपयला आला असताना अश्विनने डी ब्रुईनला बाद करून अजून एक धक्का दिला.  नाईट वॉचमन पीटला जडेजाने बोल्ड करून पाहुण्यांची अवस्था अजून गंभीर केली. खेळ थांबलाव गेला तेव्हा फलकावर 3 बाद 39  धावा दिसत होत्या.

सामन्याचे तीन दिवस अजून बाकी असले तरी तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय येणार आहे ज्याचा परिणाम खेळावर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africa scores 39 runs loosing 3 wickets against India in 1st test