U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’!

महेश बर्दापूरकर
Wednesday, 5 February 2020

भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून विश्‍वकरंडक स्पर्धेत तुफान फलंदाजी करीत पाकिस्तान संघाला धूळ चारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यशस्वी जैयस्वालचा प्रवास मोठा रंजक आहे. उत्तर प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या यशस्वीनं नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर पडेल ती कामं करीत मोठं यश मिळवलं आहे. त्याच्या संघर्षाची ही यशोगाथा... 

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वकरंडकाचा उपांत्य सामना. भारतीय गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या पाकिस्तानचा १७३ धावांत गुंडाळलं. भारताला ही धावसंख्या ओलांडून अंतिम फेरीत प्रवेश करायचा होता. सलामीला येणाऱ्या यशस्वी जैस्वालनं ही जबाबदारी स्वीकारली व धडाकेबाज शतक झळकावत पाकिस्तानला १० गडी राखून धूळ चारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या तरुण खेळाडूचा इथपर्यंत पोचण्यासाठी हेलावून टाकणारा संघर्ष थक्क करणाराच आहे.

Image result for yashasvi jaiswal"

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; दहा विकेट राखून विजय

यशस्वी जैस्वालचा जन्म २८ डिसेंबर २००१ला उत्तर प्रदेशातील सुरियावन या अत्यंत छोट्या गावात झाला. भूपेंद्र आणि कांचन या जैस्वाल दांपत्याच्या सहा अपत्यांपैकी यशस्वी चौथा. यशस्वीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती व आई-वडिलांची वयाच्या दहाव्या वर्षी त्याची रवानगी मुंबईत केली. क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या यशस्वीचा संघर्ष खूपच खडतर होता. आझाद मैदानात तो प्रशिक्षण घेत होता व त्यासाठी तो कांदीवली उपनगरात राहायला गेला. इथं त्यानं एका दूध डेअरीमध्ये अत्यंत छोटं काम स्वीकारलं आणि डेअरीतच मुक्काम करीत क्रिकेट प्रशिक्षणही सुरू ठेवलं. मात्र, थोड्यात दिवसांत दुकान मालकानं यशस्वी क्रिकेटमुळं डेअरीत पुरेसं काम करीत नसल्यानं त्याला कामावरून काढून टाकलं. आता त्याच्यासमोर रोजगाराबरोबर राहण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. शेवटी त्यानं क्रिकेटच्या मैदानात तेथील कर्मचाऱ्याबरोबर त्याच्या तंबूत राहण्याचा निर्णय घेतला.

Image result for yashasvi jaiswal"

INDvsNZ : श्रेयस, राहुलने धो डाला; भारताचा धावांचा डोंगर

क्रिकेटचं प्रशिक्षण घेत तो एका पाणीपुरीच्या गाडीवर काम करून उदरनिर्वाह करू लागला. त्याला रात्री अनेकदा उपाशीच आपल्या तंबूत जाऊन झोपावं लागत असे. तब्बल तीन वर्षं याच तंबूत काढल्यानंतर ज्वाला सिंग या सांताक्रूझमध्ये क्रिकेट अकादमी चालविण्याऱ्या प्रशिक्षकानं यशस्वीमधील टॅलेंट ओळखलं. सिंग यांनी त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला व त्याची राहण्या-खाण्याची व्यवस्थाही केली. यशस्वीचं नशीब आता पालटलं होतं. 
यशस्वीनं २०१५मध्ये गिल्स शिल्ड या शालेय स्तरावरील स्पर्धेतील सामन्यात ३१६ धावा ठोकल्या व दोन डावांत मिळून ९९ धावांत १३ बळी मिळवले. या अष्टपैलू कामगिरीमुळं त्याचं नाव चर्चेत आलं. शालेय स्तरावरील क्रिकेटमधील हा विक्रम होता व त्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. या कामगिरीच्या जोरावर त्याची मुंबईच्या १६ वर्षाखालील संघाकडून निवड झाली व त्याचबरोबर भारताच्या १९ वर्षाखालील संघातही त्याची वर्णी लागली. त्यानं २०१८मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ३१८ धावा झळकावल्या व ही स्पर्धाही भारतानं जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवकांच्या कसोटी सामन्यात त्यानं २२० चेंडूत १७३ धावाही फटकावल्या. 

Image result for yashasvi jaiswal"

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यशस्वीनं मागील वर्षी जानेवारीमध्ये मुंबईकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत, तर सप्टेंबरमध्ये हजारे करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. त्यानं हजारे करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्ध खेळताना १५४ चेंडूत २०३ धावांची अविस्मरणीय खेळी रचली व ‘अ’ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. या स्पर्धेत त्यानं सहा सामन्यांत त्यानं ११२.८०च्या सरासरीनं ५८६ धावा फटकावल्या व या कामगिरीच्या जोरावर त्याची १९ वर्षाखालील विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात निवड झाली.

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या संघानं त्याच्यासाठी २.४ कोटी रुपयांची बोली लावली असून, इथंही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 
युवा विश्‍वकरंडकामध्ये पाकिस्तानला धूळ चारण्यात यशस्वीच्या अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. लहान वयात, क्रिकेटची कोणत्याही पार्श्‍वभूमी नसताना एका लहान खेड्यातून येऊन, कोणालाही हेलावून टाकंल असा संघर्ष करीत ‘यशस्वी’ ठरलेल्या यशस्वीचं हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story on cricketer Yashasvi Jaiswal struggle