क्रीडाक्षेत्रासाठी ३५० कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात ‘खेलो इंडिया खेलो’ संकल्पनेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘खेलो इंडिया’चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या तरतुदीत ३५० कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पात ‘खेलो इंडिया खेलो’ संकल्पनेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘खेलो इंडिया’चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या तरतुदीत ३५० कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

रियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पदरी केवळ एक रौप्य आणि एक ब्राँझ अशी दोनच पदके पडली. या अपयशी कामगिरीनंतरही क्रीडा क्षेत्रात करण्यात आलेली वाढ लक्षणीय असून, पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना दिलासा मिळेल, अशी भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली. 

अपंगांसाठी खेळाचा विकास करण्यासाठी देखील या अंदाजपत्रकात पावले उचलण्यात आली आहेत. गेल्यावर्षी अंपग क्रीडा प्रकारासाठी असलेल्या तरतुदीत तब्बल ४ कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती. यावर्षी ही कपात केवळ एक लाख इतकीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय खेळांची शिबिरे आयोजित करण्यासाठी क्रीडा प्राधिकरणाच्या अनुदानात देखील वाढ करण्यात आली आहे. यावर्षी ‘साई’ला यासाठी ४८१ कोटी रुपये मिळतील. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ कमी असली, तरी दिलासा देणारी ठरू शकते. गेल्यावर्षी ‘साई’ला ४१६ कोटी रुपये मिळत होते. 

राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मात्र या वर्षीच्या अंदाजपत्रकातून फायदा होणार आहे. त्यांचा निधी १८५ कोटी रुपयांवरून ३०२ कोटी इतका वाढवण्यात आला आहे. ईशान्य भारतातील क्रीडाविकासाला पुन्हा एकदा आर्थिक हातभार मिळणार आहे. या भागात क्रीडा योजना राबविण्यासाठी आता १४८.४ कोटी रुपये मिळणार आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील क्रीडाविकासासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यांना यावर्षीदेखील गेल्यावर्षीसारखेच ७५ कोटी रुपये मिळतील. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतही फारशी वाढ करण्यात आलेली नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी निधीत केवळ ६.५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

एकूणच ‘खेलो इंडिया खेलो’चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी अंदाजपत्रकात १४० कोटी रुपयांच्या निधीवरून ३५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

गुणवत्ता शोधण्यासाठी साहाय्य
देशातील नैसर्गिक गुणवत्ता शोधण्यासाठी या वेळी खास तरतूद करण्यात आली आहे. हा मुद्दा अंदाजपत्रकाच्या आकडेवारीत निश्‍चितच लक्षवेधक ठरेल. गुणवत्ता शोध मोहीम राबविण्यासाठी या वेळी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत.

Web Title: sports field increase