अखिल शेरॉननेही राखली सुवर्णवेध मालिका

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - अखिल शेरॉनने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारत पदक क्रमवारीत अव्वल येणार हे निश्‍चित केले. अखिलनेही मनू भाकर आणि शाहजार रिझवी यांच्याप्रमाणेच पदार्पणाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

मुंबई - अखिल शेरॉनने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारत पदक क्रमवारीत अव्वल येणार हे निश्‍चित केले. अखिलनेही मनू भाकर आणि शाहजार रिझवी यांच्याप्रमाणेच पदार्पणाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

गुआदालाजारा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अखिलने मोक्‍याच्या वेळी अचूक लक्ष्यवेध केला. नीलिंगची सांगता झाल्यानंतर तो चौथा होता, पण प्रोन संपेपर्यंत त्याने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याने या टप्प्यात दोनदा १०.८ गुणांचा प्रभावी वेध घेतला होता. त्याने त्यानंतर कामगिरी उंचावतच ४५५.६ गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला आणि रौप्यपदक विजेत्या बर्नांड पिक्त (ऑस्ट्रेलिया) याला तब्बल चार गुणांनी मागे टाकले. या स्पर्धेतील सुवर्णपदक याच स्पर्धेत १० मीटर एअर रायफलचे सुवर्णपदक जिंकलेल्या इश्‍वान पेनी याने जिंकले. 

ही स्पर्धा भारतीयांसाठी खूपच मोलाची ठरली. या स्पर्धेत भारताचाच संजीव राजपूत चौथा आला, तर स्वप्नील कुसळे सातवा. संजीव नीलिंग तसेच प्रोन सिरीजनंतर अव्वल होता, पण स्टॅंडिंगमध्ये त्याची कामगिरी खालावली. अखेर तो ४३० गुणांसह चौथा आला. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असलेल्या स्वप्नीलने ४०७.२ गुणांची कामगिरी केली. पात्रता फेरीनंतर संजीव (११७६) दुसरा होता, तर अखिल (११७४) चौथा आणि स्वप्नील (११६८) सातवा होता. 

अंतिम फेरीत संजीवने प्रोनमध्ये ४०० पैकी ३९८ गुण मिळवले, तर प्रोनमध्ये अखिलप्रमाणेच ३९२. स्टॅंडिंगमध्ये भारतीयांत स्वप्नील (३९०) सरस ठरला. खर तर  पंधराव्या शॉटस्‌नंतर राजपूतने अव्वल क्रमांक मिळविताना अखिलला १.१ गुणांनी मागे टाकले होते. त्याचवेळी वाऱ्याचा वेग वाढला. 

या टप्प्यात अखिलने चांगली कामगिरी करीत अव्वल क्रमांक मिळवला.

मनू पाचव्या क्रमांकावर
मनू भाकरला २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तिने यापूर्वी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. पात्रतेत मनू ५८१ गुणांसह पाचवी होती, तर अन्नू राज सिंग (५७५) दहावी. अंतिम फेरीत सुरवातीच्या टप्प्यात आठ गुणांचा वेध मनूकडून घेतला गेला, पण त्यानंतरही चौथ्या सिरीजनंतर ती तिसरी होती. सहाव्या सिरीजनंतर मनू, जर्मनीची स्केरीज आणि फ्रान्सची मॅथिदे यांची बरोबरी झाली होती. त्यातून मनू बचावली, पण सातव्या सिरीजनंतर ती पाचवी होती. पण अखेर तिला बाद व्हावे लागले. 

भारताचे अग्रस्थान पक्के
स्पर्धेतील अखेरच्या दिवसाची एक स्पर्धा शिल्लक असताना भारताने चार सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील चीन तसेच अमेरिकेने प्रत्येकी दोन सुवर्णपदकांसह पाच पदके जिंकली आहेत, त्यामुळे ते भारतास मागे टाकण्याची शक्‍यता नाही. पुरुषांची स्कीट स्पर्धाच सांगता दिनी होणार आहे, त्यामुळे तीनही पदके जिंकली तरी चीन किंवा अमेरिका भारतास मागे टाकणार नाही. 

ॲरॉन शेरॉनने अखेर सुवर्णपदक जिंकत गुणवत्तेस न्याय दिला. 
तो जास्त चिकित्सक आहे, त्यामुळे यश दुरावत होते. मूळचा रायफल नेमबाज असलेला शेरॉन एक आवड म्हणून थ्री पोझिशन करीत होता, पण त्यात तो चांगले करू लागल्यावर त्याला यात झोकून देण्यास सांगितले. त्याचबरोबर केवळ आवड नव्हे तर त्याचा कसून अभ्यास करण्याची सूचना केली. त्यामुळेच यश आले आहे. 
- दीपाली देशपांडे, भारताच्या राष्ट्रीय कुमार मार्गदर्शिका

Web Title: sports news akhil Sharon