मोहित्यांचा ध्रुव पदार्पणात अढळ

मोहित्यांचा ध्रुव पदार्पणात अढळ

मुंबईच्या आदित्य पवारलाही तिसरा क्रमांक

कोईमतूर - राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेला रविवारी रोमहर्षक प्रारंभ झाला. कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने पहिल्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्याच्या कारचा धक्का बसल्यानंतरही मनोधैर्य कायम राखत दुसऱ्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविला. मुंबईकर आदित्य पवारने पहिल्या शर्यतीत तिसरे स्थान मिळवीत महाराष्ट्रासाठी लक्षवेधी कामगिरी केली.

करी मोटर स्पीडवेवर ध्रुवने पात्रता फेरीत तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे त्याला किमान तिसऱ्या क्रमांकासह पोडियम फिनिशची संधी होती; पण अडखळत्या प्रारंभानंतर त्याच्या कारला बांगलादेशच्या अफ्फान सादातच्या कारचा धक्का बसला. त्यानंतरही ध्रुवने १५ फेऱ्यांची शर्यत पूर्ण करीत पाचवे स्थान मिळविले. दुसरीकडे पाचव्या स्थानावरून प्रारंभ केलेल्या आदित्यने तिसरे स्थान पटकावले. इतर दोन स्पर्धकांना पेनल्टी बसल्याचा या दोघांना फायदा झाला.

दुसऱ्या शर्यतीत ध्रुवने अपयशाची भरपाई केली. पहिली शर्यत जिंकलेल्या करमिंदर सिंग आणि संदीप कुमार यांच्यात जोरदार चुरस झाली.

करमिंदरच्या कारचा डावा हेडलाइट; तर संदीपच्या कारचे उजवे बम्पर गार्ड तुटले. या दोघांत धुमश्‍चक्री सुरू असताना ध्रुवने अकारण धोका न पत्करता तिसरे स्थान कायम राखले. ही शर्यत संदीपने जिंकली. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर गुणतक्‍त्यात करमिंदर व संदीपने संयुक्त आघाडी घेतली.

ध्रुवने सांगितले, की पहिल्या शर्यतीत संधी हुकली तरी मी १५ फेऱ्या पूर्ण केला. माझा वेग तुल्यबळ होता. त्यामुळे अकारण निराश होण्याची गरज नव्हती. आदित्य म्हणाला की, प्रतिस्पर्ध्यांना पेनल्टी बसली याचा अर्थ नशिबाची साथ मिळाली असे वाटू शकेल; पण रेस ट्रॅकवर काहीही सोपे नसते.
फोक्‍सवॅगन रेसिंगप्रमुख शिरीष विस्सा यांनी सांगितले की, ड्रायव्हर घडविण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी आम्ही या वेळी पूर्ण भारतीय बनावटीची रेस कार तयार केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com