अपर्णाने फडकाविला एव्हरेस्टवर तिरंगा

मुकुंद पोतदार
सोमवार, 29 मे 2017

पुणे: पुण्याच्या अपर्णा प्रभुदेसाईने एव्हरेस्टवर तिरंगा झळकाविला. तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट सर केलेली ती महाराष्ट्राची पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली. वयाच्या 47व्या वर्षी तिने ही कामगिरी करणे आणखी कौतुकास्पद ठरले.

पुणे: पुण्याच्या अपर्णा प्रभुदेसाईने एव्हरेस्टवर तिरंगा झळकाविला. तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट सर केलेली ती महाराष्ट्राची पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली. वयाच्या 47व्या वर्षी तिने ही कामगिरी करणे आणखी कौतुकास्पद ठरले.

ल्हासाहून काठमांडूत दाखल झालेल्या अपर्णाशी "व्हॉट्‌सऍप कॉल'वरून संवाद साधला. त्यांनी सांगितले, की 21 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मी "समिट अटेंम्प्ट' सुरू केला. समिट कॅंप 8323 मीटरवर होता. आम्ही पहाटे सव्वाचारच्या सुमारास जगातील सर्वोच्च शिखरावर गेलो. आमच्या अपेक्षेपेक्षा लवकर चढाई पूर्ण झाली, पण त्यामुळे अंधार होता. त्यामुळे तिरंगा झळकावला तेव्हाचा फोटो कसाबसा काढता आला. 10-15 मिनिटांनी सूर्यकिरणे डोकावू लागली, पण तोपर्यंत नेपाळच्या बाजूने गिर्यारोहक-शेर्पा वर येऊ लागले होते. गर्दी वाढायच्या आत आम्हाला खाली जाणे आवश्‍यक होते.

एव्हरेस्टवर पाऊल टाकले तेव्हा काय विचार मनात आला, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, "मी जेमतेम पाच-सहा मिनिटे एव्हरेस्टवर होते. गेल्या तीन वर्षांपासून मी तयारी करीत होते. हे स्वप्न साकार झाल्यामुळे आणि माझ्या कष्टाचे चीज झाल्याबद्दल आणि त्यास फळ दिल्याबद्दल मी "चोमोलुंग्माला' (एव्हरेस्टचे तिबेटी भाषेतील नाव) दंडवत घातला. "चोमोलुंग्मा' ही "महादेवी' आहे. तिचे वरदान लाभण्याचा क्षण वाट्याला येणे हे महाभाग्यच!''

हवामानाविषयी त्या म्हणाल्या, ""नॉर्थ कोलपासून कॅंप 2 पर्यंत आले तेव्हा एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. तीन-चार टेंट वाऱ्यामुळे फाटले होते. त्यामुळे आम्हाला लहान टेंटमध्ये राहावे लागले.''

मोहीम पूर्णत्वास नेण्यातील मुख्य आव्हान कोणते होते, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ""मी लवकरच भावनांचा बांध रोखला. मनात एकच विचार होता आणि तो म्हणजे "सेफ्टी'. आता आपल्याला सुरक्षित खाली जायचे आहे हीच खूणगाठ मनाशी बांधली होती.''

नऊ मृतदेह...
एव्हरेस्ट मोसमाला यंदा अत्यंत प्रतिकूल हवामानाचा फटका बसला. याशिवाय तिबेटकडील बाजूला सुद्धा गिर्यारोहकांचे मृतदेह चढाईच्या मार्गात होते. याविषयी अपर्णा म्हणाली, ""शेर्पांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा मार्गात एकूण 16 मृतदेह होते. यातील नऊ मला चढाईच्या वेळी दिसले. काही जणांचा एव्हरेस्ट सर केल्यानंतर मृत्यू झालेला असतो, तर काही जण त्यात अपयशी ठरलेले असतात. असे मृतदेह दिसतात तेव्हा तुमच्या मनोधैर्याची कसोटी लागते.''

Web Title: sports news aparna prabhudesai and everest