अरोनियन-डींगची सलामीला बरोबरी

पीटीआय
रविवार, 24 सप्टेंबर 2017

टिब्लिसी (जॉर्जिया) - विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या निर्णायक लढतीत आर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन (२८०२) व चीनचा डींग लिरेन (२७७१) यांच्यातील पहिला डाव बरोबरीत सुटला. 

टिब्लिसी (जॉर्जिया) - विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या निर्णायक लढतीत आर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन (२८०२) व चीनचा डींग लिरेन (२७७१) यांच्यातील पहिला डाव बरोबरीत सुटला. 

अंतिम फेरी निर्धारित चार पारंपरिक डावांची असेल. त्यात बरोबरी झाल्यास टायब्रेक होईल. पहिल्या डावात ३५ चाली झाल्यानंतर उभय खेळाडूंनी एक गुण वाटून घेतला. अरोनियनने पांढऱ्या मोहऱ्यासह इंग्लिश ओपनिंगचा अवलंब केला. त्याने तिसऱ्या चालीस प्याद्याची ‘इ ४’ चाल केली. त्यामुळे डाव ‘मिकेनास’ विविधतेत रूपांतरित झाला. या दुर्मिळ चालीमुळे उत्कंठा निर्माण झाली होती. ही विविधता बुद्धिबळ खेळाडू, पंच व पत्रकार व्लादास मिकेनास यांच्या नावाने ओळखली जाते. 

अनातोर्ली कार्पोव-गॅरी कास्पारोव यांच्यात १९८५ मध्ये झालेल्या जगदज्जेतेपदाच्या लढतीत ते ‘आर्बीटर’ होते. १४व्या चालीस वजिरावजिरी झाली. पुढच्याच चालीस अरोनियनने अश्‍वाची ‘जी ५’ ही सुंदर चाल केली. त्यामुळे लिरेनसाठी कॅसलिंग अशक्‍य बनले. २२व्या चालीस लिरेनने ‘जी फाइल’मध्ये ‘डबल रुक पॉवर’ रणनीतीचा अवलंब केला. यामुळे रंगत आणखी वाढली; मात्र ३३व्या चालीपासून प्रेक्षकांची अखेर निराशा झाली. अरोनियनचा हत्ती व लिरेनचा उंट यांच्यात चालींची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे निर्णायक निकाल लागला नाही.

Web Title: sports news Armenian Lion vs Chinese Dragon