आशियाई ॲथलेटिक्‍ससाठी कलिंगा स्टेडियम सज्ज

स्मृती सागरिका-कानुगो 
गुरुवार, 29 जून 2017

भुवनेश्‍वर - हॉकी सामन्यांच्या आयोजनामुळे झपाट्याने आंतरराष्ट्रीय क्रीडापटलावर झळकाणारे भुवनेश्‍वर येथील कलिंगा स्टेडियम आता आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे.

भुवनेश्‍वर - हॉकी सामन्यांच्या आयोजनामुळे झपाट्याने आंतरराष्ट्रीय क्रीडापटलावर झळकाणारे भुवनेश्‍वर येथील कलिंगा स्टेडियम आता आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे. 

अवघ्या ९० दिवसांच्या कालावधीत स्टेडियमवरील ट्रॅक आणि अन्य अत्याधुनिक सुविधा उभारण्यात ओडिशा प्रशासनाला यश आले असून, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्‍स महासंघाने या केंद्राला सर्वोत्तम दर्जादेखील दिला आहे. पुढील महिन्यात ५ जुलै रोजी या स्पर्धेला सुरवात होणार असून, स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळादेखील भव्यदिव्य आणि आकर्षक करण्यासाठी प्रशासन झटत आहे. 

कलिंगा सोशल सायन्स इन्स्टिट्यूटचे ३०० विद्यार्थी हा उद्‌घाटन सोहळा सादर करणार असून, त्यांचा सराव जोरात सुरू आहे. बॉलीवूडमधील झेनिथ ड्रान्स ग्रुपचे नृत्यदिग्दर्शक आणि ओडिशातील नृत्यदिग्दर्शक विद्याधर बरिक या विद्यार्थ्यांकडून सराव करून घेत आहेत. येत्या शनिवारी (ता. १) मुख्य स्टेडिमवर त्यांच्या कार्यक्रमांची अंतिम रंगीत तालीम होणार आहे. 
स्पर्धेदरम्यान सुरक्षा व्यवस्थादेखील कडेकोट ठेवण्यात आल्याचे पोलिस महासंचालक कुंवर ब्रजेशसिंग यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘कलिंगा स्टेडियम आणि खेळाडूं राहणार असलेल्या हॉटेल्समधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. स्पर्धे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.’’

वाळू शिल्पाचे आकर्षण
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक स्पर्धेच्या निमित्ताने ओडिशाची संस्कृती दर्शविणारे वाळूचे भव्य शिल्प तयार करणार आहेत. ओडिशाची संस्कृती दर्शविताना ते प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती उभारणार असून, त्यासाठी चार दिवस सुमारे नऊ टन वाळू लागेल.

कालिदास, संजीवनी, अर्चनाची निवड

नागपूर - भुवनेश्‍वर येथे ६ ते ९ जुलै या कालावधीत होणाऱ्या २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ९५ खेळाडूंचा भारतीय संघ घोषित करण्यात आला. त्यात ४७ महिला ॲथलिट्‌सचा समावेश आहे. यात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे, नाशिकची संजीवनी जाधव आणि पुण्याचा अर्चना अढाव यांना स्थान मिळाले आहे. 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेत भारतीय ॲथलिट्‌सने १३ पदके जिंकली होती. या वेळी अधिक पदके जिंकण्याची क्षमता भारतीय धावपटूंमध्ये आहे, असा विश्‍वास भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केला. निवड करण्यात आलेल्या धावपटूंपैकी नयना जेम्स, जॉयलीन मुरली लोबो, विकास गौडा, सिद्धार्थ मोहन नायक, यू. कार्तिक, सिद्धांत थिंगलीया यांची चाचणी झाल्यानंतरच त्यांचा प्रवेश निश्‍चित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. मुंबईकर सिद्धांत थिंगलियाची चाचणी २ जुलै, तर इतरांची ३० जून रोजी होईल. 

साताऱ्याचा कालिदास हिरवे दहा हजार मीटर शर्यतीत सहभागी होईल. नाशिकची संजीवनी जाधव महिलांच्या पाच व दहा हजार मीटर शर्यतीत पदकासाठी प्रयत्न करेल. आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्चना अढावची प्रथमच वरिष्ठ गटात भारतीय संघात निवड झाली आहे. फेडरेशन करंडक स्पर्धेत १०० मीटर हर्डल्स शर्यतीत रौप्यपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या अंकिता गोसावीची मात्र आश्‍चर्यजनकपणे निवड होऊ शकली नाही. 

Web Title: sports news asia athletics competition