लक्ष्मण, चित्राला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेतील भारताची सुवर्णधाव सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. मध्यम पल्ल्याचा धावक लक्ष्मण गोविंदन तसेच चित्राने सुवर्णपदक जिंकले, तर ॲथलेटिक्‍स व्यतिरिक्तचे भारताचे पहिले पदक कुस्तीगीर धरमेंदरने जिंकले. 

मुंबई - आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेतील भारताची सुवर्णधाव सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. मध्यम पल्ल्याचा धावक लक्ष्मण गोविंदन तसेच चित्राने सुवर्णपदक जिंकले, तर ॲथलेटिक्‍स व्यतिरिक्तचे भारताचे पहिले पदक कुस्तीगीर धरमेंदरने जिंकले. 

तुर्कमेनिस्तान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चार वर्षांपूर्वीची कामगिरी उंचावत गोविंदनने तीन हजार मीटर शर्यतीत बाजी मारली. आशियाई स्पर्धेत पाच हजार तसेच दहा हजार मीटर शर्यत जिंकलेल्या गोविंदनने सुवर्णपदक जिंकत अपेक्षापूर्ती केली. त्याने पात्रता फेरीत ८ मिनिटे ५०.८१ सेकंद अशी वेळ देत अव्व्वल क्रमांक मिळविला होता. अंतिम फेरीत त्याने ८ मिनिटे २.३० सेकंदांत शर्यत पूर्ण करताना तारीक अहमद अलमारी यास १.६८ सेकंदाने सहज मागे टाकले. 

तीन हजार मीटरपैकी गोविंदनने आघाडी घेतली होती. त्यानंतर त्याचा वेग काहीसा मंदावला. त्याचा फायदा घेत तारीकने आघाडी घेतली होती, पण त्याला अखेरच्या एक हजार मीटरमध्ये मागे टाकत गोविंदन विजेता ठरला. चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत गोविंदनने एक रौप्य आणि एक ब्राँझ जिंकले होते. त्यापेक्षा त्याने सरस कामगिरी केली.

महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत चित्राने बाजी मारली. गरीब घरातून आलेल्या चित्राने भुवनेश्वर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने पुन्हा सुवर्णपदक जिंकताना ४ मिनिटे २७.७७ सेकंद वेळ दिली. चित्रा बाराशे मीटरपर्यंत मागे होती, पण तिने अखेरच्या टप्प्यात वेग वाढवत प्रतिस्पर्धीस अखेर चार सेकंदाने मागे टाकले. 

पुरुषांच्या बेल्ट रेस्टलिंगमधील फ्रीस्टाइल प्रकारातील ७० किलो गटात धरमेंदरने पाकिस्तानच्या महंमद शरीफला ७-३ असे हरवून विजयी सुरवात केली. बचावात्मक कुस्ती केल्याबद्दल या वेळी पाकच्या शरीफला ताकीदही देण्यात आली. धरमेंदर उपांत्य लढतीत यागस्मियारॅत अएन्नामिरादॉव याच्याविरुद्ध ०-५ असा पराजित झाला. या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराजित स्पर्धकास ब्राँझ देण्यात येते.

Web Title: sports news asia indoor sports competition