आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग, ओमप्रकाशला ब्राँझ

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई - कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारात आज भारताला दोन ब्राँझपदके मिळाली. बजरंग पुनिया आणि ओमप्रकाश विनोद यांनी रिपेचेजमधून ही कामगिरी केली. महाराष्ट्राच्या राहुल आवारेला मात्र पात्रता सामन्यातच हार स्वीकारावी लागली.

मुंबई - कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारात आज भारताला दोन ब्राँझपदके मिळाली. बजरंग पुनिया आणि ओमप्रकाश विनोद यांनी रिपेचेजमधून ही कामगिरी केली. महाराष्ट्राच्या राहुल आवारेला मात्र पात्रता सामन्यातच हार स्वीकारावी लागली.

बजरंग पुनिया भारताचे आशास्थान असलेला मल्ल आहे. त्याने ६५ किलोमध्ये ब्राँझपदक जिंकले, तर ओमप्रकाशने ७० किलो गटात पदक विजेती कामगिरी केली. बजरंगने ब्राँझपदकाच्या लढतीत इराणच्या योनेस अलिअकबर इमामीचोघेईचा १०-४ असा सहज पराभव केला. त्याअगोदर त्याने तजाकिस्तानच्या अब्दुल कोसीमचा १२-२ असा धुव्वा उडवला होता. पात्रता स्पर्धेत तुर्कमेनिस्तानच्या सम्प्रमर्यत मेत्रोदोवर तब्बल १६-५ असा शानदार विजय मिळवत बजरंगने रणशिंग फुंकले होते; परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्याला जपानच्या दाईची ताकातानीकडून ५-७ अशी हार स्वीकारावी लागली. ताकातानी अंतिम फेरीत गेल्यामुळे बजरंगला रिपेजेसमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने ब्राँझपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात यजमान कझाकिस्तानच्या दौलेत नियाझबेकोवने ताकातानीला हरवून सुवर्ण जिंकले. 

७० किलो गटात ओमप्रकाशला प्राथमिक फेरीत पुढे चाल मिळाली; परंतु उपांत्यपूर्व फेरीत त्याचा उझबेकिस्तानच्या तिक्तियोर नौरुझोवकडून ३-५ असा पराभव झाला. तिक्तियोर अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे रिपेजेसमध्ये संधी मिळालेल्या ओमप्रकाशची ब्राँझपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या इलामन डॉगद्रुबेकविरुद्ध ३-३ अशी बरोबरी झाली; परंतु अखेरचा गुण ओमप्रकाशने जिंकला असल्यामुळे तो पदक विजेता ठरला.

Web Title: sports news Asian wrestling