नयना, नवजित, नीरजची राष्ट्रकुल पात्रता

Athletics
Athletics

नागपूर - पतियाळा येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या पहिल्या भारतीय ग्रांप्री स्पर्धेने नवीन मोसमाला सुरवात झाली. सहभाग कमी असल्यामुळे स्पर्धेतील रंगत जरुर कमी झाली होती. मात्र, नयना जेम्स, नवजित कौर आणि नीरज चोप्रा या तिघांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाने निर्धारित केलेली पात्रता पार केली. 

राष्ट्रीय शिबिरात असलेल्या सर्व धावपटूंना ग्रांप्री स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य केल्यानंतरही अनेक प्रकारांमध्ये अल्प प्रतिसाद होता. अंजू बॉबी जॉर्जची वारसदार समजल्या जाणाऱ्या केरळच्या नयना जेम्सने ६.४७ मीटर अंतरावर उडी मारून राष्ट्रकुलसाठी आपले तिकीट जवळजवळ पक्के केले आहे. कारण यासाठी ६.४५ मीटरची पात्रता ठेवण्यात आली होती. नयनाने गेल्या वर्षी भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. २०१४ मध्ये ज्युनियर विश्‍व स्पर्धेत थाळीफेकीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या नवजित कौर ढिल्लाँने ५९.१८ मीटर अंतरावर थाळी फेकीत सर्वांना चकीत केले. ५९ मीटरची पात्रता पार करीत आपण गोल्ड कोस्ट येथे पदकाचे दावेदार आहोत, हे तिने दाखवून दिले. पुरुषांच्या भालाफेकीत खेळाडूंची निवड करताना निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कारण सध्याच्या घडीला ८० मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकणारे चार खेळाडू भारतीय संघात आहेत. आज नीरज चोप्राने ८२.८८ मीटर अंतरावर भाला फेकून यंदाच्या आपल्या कामगिरीत ८ सेंटिमीटरने सुधारणा केली. गेल्या महिन्यात जर्मनीतील ओफेनबर्ग येथे त्याने ८२.८० मीटर अशी कामगिरी केली होती. उत्तर प्रदेशच्या विपीन कसानाला पात्रता गाठता आली नसली तरी त्याने ८० मीटर अंतर (८०.०४ मीटर) प्रथमच पार केले. पुरुषांच्या तिहेरी उडीत राकेश बाबूची पात्रता अवघ्या एका सेंटिमीटरने हुकली. त्याने अरपिंदर सिंग आणि रणजित माहेश्‍वरी या दोन अनुभवी खेळाडूंना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर ढकलताना १६.५९ मीटर अंतरावर उडी मारली. 

दरम्यान, द्युती चंद आणि एस. विद्यासागर यांनी १०० मीटर शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. विद्यासागरने १०.६५ सेकंद, तर द्युतीने ११.५७ सेकंद वेळ दिली. यानंतरही दोघेही राष्ट्रकुलची पात्रता सिद्ध करू शकले नाहीत. आशियाई इनडोअर आणि त्यानंतर आशियाई क्रीडा पूर्व स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या एलकिया दासनने स्पर्धेत भागच घेतला नाही. पुरुषांच्या तीन हजार मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेने प्रथम क्रमांक मिळविला. त्याने ८ मिनिटे २६.५४ सेकंदांत शर्यत पूर्ण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com