साईना, सिंधू, श्रीकांत, साईप्रणितचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सिडनी - बिगरमानांकित भारताच्या साईना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने चौथ्या मानांकित सुंग जी ह्यून हिला २१-१०, २१-१६ असे दोन गेममध्येच हरविले. पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत आणि बी. साईप्रणित यांनीही आगेकूच केली.

सिडनी - बिगरमानांकित भारताच्या साईना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने चौथ्या मानांकित सुंग जी ह्यून हिला २१-१०, २१-१६ असे दोन गेममध्येच हरविले. पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत आणि बी. साईप्रणित यांनीही आगेकूच केली.

साईनाने पहिला गेम आरामात जिंकला. त्यामुळे तिचे मनोधैर्य उंचावले. दुसऱ्या गेममध्ये कोरियाच्या सुंगने झुंज दिली. सुंगने सलग पाच गुण जिंकले. त्यामुळे १४-१४ अशी बरोबरी होती. त्यानंतर मात्र साईनाने पकड भक्कम केली. त्यामुळे सुंगला आणखी दोनच गुण जिंकता आले. हा सामना ३८ मिनिटे चालला. साईनाची आता मलेशियाच्या सोनिया चिह हिच्याशी लढत होईल.

सिंधूला मात्र जपानच्या सायाका सातो हिच्याविरुद्ध झगडावे लागले. चुरशीने झालेला पहिला गेम तिने जिंकला. सायाकाने इंडोनेशियातील स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे तिने सहजी हार मानली नाही. १०-१३ पिछाडीनंतर तिने सलग सात गुण जिंकत हा गेम पटकावला. निर्णायक गेममध्ये बरीच चुरस झाली. सिंधूकडे ११-९ अशी निसटती आघाडी होती. त्यानंतरही बऱ्याच दीर्घ रॅली झाल्या. त्यात बाजी मारत सिंधूने २०-१४ अशी आघाडी घेतली. तिला सहा मॅचपॉइंट मिळाले होते. यातील चार सायाकाने वाचविले. अखेर सिंधूने पुढील गुण जिंकला. हा सामना एक तास पाच मिनिटे चालला. सिंधूसमोर चीनच्या चेन झियाओझीन हिचे आव्हान असेल. चेनने भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डेवर २१-१७, १२-२१, २१-१२ अशी मात केली.

इंडोनेशियन ओपन विजेत्या श्रीकांतने उंचावलेल्या अपेक्षांची पूर्तता करीत चीनच्या चाओ यू कॅन याला २१-१३, २१-१६ असे हरविले. हा सामना त्याने २७ मिनिटांतच जिंकला. त्याच्यासमोर अग्रमानांकित कोरियाच्या सोन वॅन हो याचे आव्हान असेल. साईप्रणितला मात्र इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोने झुंजविले. ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात साईप्रणितने १०-२१, २१-१२, २१-१० असा विजय मिळविला. आता त्याची चीनच्या युक्षीयांग हुआंगशी लढत होईल.

पी. कश्‍यप, सिरील वर्मा आणि अजय जयराम यांना मात्र निराशाजनक पराभव पत्करावा लागला. जयरामला हाँगकाँगच्या का लाँग अँगस एन्जीने १४-२१, २१-१०, २१-९, सिरीलला डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्तीयन विट्‌टींग्युसने २१-१६, २१-८, तर सोनने कश्‍यपला २१-१८, १४-२१, २१-१५ असे हरविले. कश्‍यपने अग्रमानांकित प्रतिस्पर्ध्याला एक तास पाच मिनिटे झुंज देणे कौतुकास्पद ठरले.

दुहेरीचे निकाल 
पुरुष : सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी विवि लॉ चेयूक हिम-ली जून हेई रेजीनाल्ड (हाँगकाँग) २०-२२, २१-१९, २१-११. बून हिआँग टॅन (मलेशिया) हेंद्रा सेतियावन (इंडोनेशिया) विवि फ्रान्सिस अल्विन-तरुण कोना २१-१७, २१-१५. ताकेशी कामुरा-कैगो सोनोदा (जपान) विवि मनू अत्री-बी. सुमित रेड्डी २२-२०, २१-६. 
मिश्र : होई वाह चाऊ-चून हेई रेजीनाल्ड विवि अश्‍विनी पोनाप्पा-सात्विकसाईराज रंकीरेड्डी २१-१३, २१-१७. 
महिला :  अश्‍विनी-एन. सिकी रेड्डी विवि ह्‌सुआब यू चेन-जेनीफर टॅम (ऑस्ट्रेलिया) २१-११, २१-१३.

Web Title: sports news austrolian open series badminton competition