गुरू गोपीचंदांचे यश शिष्य मिळवणार?

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - १७ वर्षांपूर्वी पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाचा २१ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. आता गोपीचंद यांच्या विजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य त्यांचे शिष्य पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत यांच्याकडून बाळगली जात आहे.

मुंबई - १७ वर्षांपूर्वी पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाचा २१ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. आता गोपीचंद यांच्या विजेतेपदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य त्यांचे शिष्य पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत यांच्याकडून बाळगली जात आहे.

प्रकाश पदुकोण (१९८०) आणि गोपीचंद (२००१) सोडल्यास भारतीयांना या बॅडमिंटन जगतातील प्रतिष्ठेच्या स्पर्धा विजेतेपदाने गुंगाराच दिला आहे. सिंधू तसेच श्रीकांत यांच्यात हे घडवण्याची नक्कीच क्षमता आहे. त्यांना पहिल्या फेरीत अनुकूल ड्रॉही लाभला आहे; पण नव्या पद्धतीने सर्व्हिस करण्याचे आव्हान, अपेक्षांचे वाढते दडपण यास भारतीय कसे सामोरे जातात हे महत्त्वाचे आहे. 

पुनरागमन करणाऱ्या साईनासमोर सलामीलाच जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या तई झू यिंग हिचे आव्हान असेल. तई झू हिने साईनाविरुद्धच्या १४ पैकी नऊ लढती जिंकल्या आहेत. यात गेल्या सात सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे साईना उद्या जिंकल्यास भारतीय पथकाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावेल. दोन वर्षांपूर्वा कॅरोलिन मरिनविरुद्धची अंतिम फेरीतील हार ही साईनाची सर्वोत्तम कामगिरी, तर सिंधूची गतवर्षीची उपांत्यपूर्व फेरी. 

जागतिक क्रमवारीत चौथी असलेली सिंधू सलामीला थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवाँग हिच्याविरुद्ध खेळणार आहे. तिच्याबाबत फारशी कोणाला माहिती नाही. ही लढत जिंकल्यास सिंधूला दुसऱ्या फेरीत इंडिया ओपन स्पर्धेत हरवलेल्या बेईवेन झॅंग हिचा सामना करावा लागेल. 

गतवर्षी चार स्पर्धा श्रीकांतने जिकल्या होत्या; पण या स्पर्धेत सलामीलाच पराजित झाला होता. त्याला सलामीची लढत सोपी असेल. फ्रान्सचा ब्राईस लेव्हरेडेझ त्याचा प्रतिस्पर्धी आहे; पण त्याने गतवर्षी चीनच्या ली चाँग वेई याला हरवले होते. साईप्रणीत सलामीला कोरियाच्या सॉन वॅन हो याच्याविरुद्ध पहिला विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. पायाच्या दुखापतीतून सावरलेल्या एच. एस. प्रणॉयसमोर आठवा मानांकित चोऊ तिएन चेन आहे. 

श्रीकांतला अग्रस्थान मिळविण्याची संधी
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल होण्याची संधी श्रीकांतला आहे. गतवर्षी चीन ओपनमधून माघार घेतल्यामुळे त्याची संधी हुकली होती; पण आता श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरी गाठली. ली चाँग वेई, चेन लाँग; तसेच सॉन वॅन हो अपयशी ठरले, तर श्रीकांत अव्वल होण्याची संधी आहे.

ताई झू हिने गेल्या वर्षी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे ती केवळ भारतीयांनाच हरवते, असे नव्हे. तिचा खेळ भेदणे अवघड आहे; पण अशक्‍य नाही. तिला हरवण्याचा मार्ग आम्हाला गवसत आहे. 
- साईना नेहवाल 

सहा आठवड्यांच्या सरावाचा नक्कीच फायदा होईल. या वर्षी अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. त्याला ऑल इंग्लंडने सुरवात होत आहे. चांगली सुरवात नक्कीच मोलाची असेल.
- पी. व्ही. सिंधू

शंभर वर्षांची परंपरा असलेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी महत्त्वाची  असेल. या स्पर्धेतील विजेत्यास लीजंड्‌ म्हटले जाते. प्रकाश सर आणि गोपीचंद सर यांचे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. 
- किदांबी श्रीकांत

Web Title: sports news badminton gopichand srikant