‘सुपर’ श्रीकांत अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

युक्वीला धक्का; आज चेनशी लढत

सिडनी - भारताच्या किदांबी श्रीकांतने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील घोडदौड कायम राखत अंतिम फेरीत मुसंडी मारली. इंडोनेशियन विजेत्या श्रीकांतने चौथ्या मानांकित शी युक्वी याच्यावर दोन गेममध्येच मात केली. श्रीकांतने सलग तिसऱ्यांदा सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

युक्वीला धक्का; आज चेनशी लढत

सिडनी - भारताच्या किदांबी श्रीकांतने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील घोडदौड कायम राखत अंतिम फेरीत मुसंडी मारली. इंडोनेशियन विजेत्या श्रीकांतने चौथ्या मानांकित शी युक्वी याच्यावर दोन गेममध्येच मात केली. श्रीकांतने सलग तिसऱ्यांदा सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

सिंगापूर ओपनमध्ये त्याचा देशबांधव बी. साईप्रणित याच्याकडून पराभव झाला होता, तर इंडोनेशियातील यशानंतर त्याला सलग दुसऱ्या सुपर सिरीज विजेतेपदाची संधी आहे. रविवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत त्याच्यासमोर ऑलिंपिक विजेत्या चेन लाँग याचे आव्हान असेल. चेनने कोरियाच्या ली ह्यून इल याचा २६-२४, १५-२१, २१-१७ असा पराभव केला.

श्रीकांतने नेटजवळ भक्कम खेळाचे प्रदर्शन केले. त्याचवेळी त्याने प्रतिस्पर्ध्याला चकविण्यातही यश मिळविले. दुसऱ्या गेममध्ये तो १८-११ असा आघाडीवर होता. त्यावेळी ‘ओव्हरहेड स्मॅश’ मारण्याच्या प्रयत्नात तो घसरला आणि पडला. त्यावेळी भारतीय चाहत्यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, पण श्रीकांतने याचा प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही. त्याने आणखी एक ‘क्रॉस कोर्ट जम्प स्मॅश’ मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.

श्रीकांतने पहिल्या गुणापासून आक्रमक खेळ केला. फसवे ‘ड्राइव्ह’ आणि ‘जंप स्मॅश’ मारत त्याने युक्वीची लय विस्कळित केली. नेटजवळ तर त्याने ‘ड्राइव्ह’मध्ये वैविध्य राखले. एरवी दुहेरीचे खेळाडू मारतात तसे ड्राइव्ह मारण्याचा धडाका त्याने सुरू केला. याशिवाय संधी मिळताच त्याने रेषेलगतही फटके मारले. पहिल्या गेमच्या मध्यास श्रीकांतने रॅकेटची बाजू ऐनवेळी बदलत ‘बॅक-हॅंड टॅप’ मारला. त्यावेळी युक्वी चकित झाला होता. 
निकाल - किदांबी श्रीकांत विवि शी युक्वी २१-१०, २१-१४

‘स्वप्नवत कामगिरी’
श्रीकांतने सांगितले की, ‘मी दोन वर्षांच्या खंडानंतर सिंगापूरमध्ये सुपर सिरीज अंतिम फेरी गाठली. त्यानंतर पुढील दोन स्पर्धांत अशी कामगिरी करणे स्वप्नवत आहे. मी संपूर्ण सामन्यात नियंत्रण राखले. मी युक्वीला सुरवातीला सहजी गुण मिळू दिले नाहीत. युक्वी तग धरून राहतो आणि शटल परतवित राहतो. मध्येच तो वेगळा फटका मारतो. मी नेटजवळ नियंत्रण राखणे महत्त्वाचे ठरले. अंतिम सामन्याचा विचार मी अद्याप केलेला नाही.’

Web Title: sports news badminton player kidambi srikanth in final