भारताच्या लक्ष्य सेनला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अंतिम फेरीत झ्वोनिमीर डर्किनयाकवर संघर्षपूर्ण मात
सोफिया (बल्गेरिया) - भारताच्या उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने गुरुवारी बल्गेरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने क्रोएशियाच्या द्वितीय मानांकित झ्वोनिमीर डर्किनयाक याच्यावर १८-२१, २१-१२, २१-१७ असा विजय मिळविला.

अंतिम फेरीत झ्वोनिमीर डर्किनयाकवर संघर्षपूर्ण मात
सोफिया (बल्गेरिया) - भारताच्या उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने गुरुवारी बल्गेरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने क्रोएशियाच्या द्वितीय मानांकित झ्वोनिमीर डर्किनयाक याच्यावर १८-२१, २१-१२, २१-१७ असा विजय मिळविला.

लक्ष्यने दोन दिवसांपूर्वीच आपला १६वा वाढदिवस साजरा केला. उपांत्य फेरीत त्याने श्रीलंकेच्या दिनुका करुणारत्ने याचे आव्हान सरळ गेममध्ये २१-१९, २१-१४ असे मोडून काढले होते. अंतिम फेरीत त्याने पहिली गेम गमावली. पण नंतर दोन्ही गेम जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. ही लढत ५७ मिनिटे चालली. 

या वर्षी फेब्रुवारीत लक्ष्यने वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्याच्या उपलब्धीबद्दल प्रशिक्षक विमलकुमार म्हणाले, ‘‘लक्ष्यसाठी नक्कीच ही मोठी कामगिरी आहे. तो अजूनही कुमार गटातील खेळाडू आहे. तरीदेखील खुल्या गटात सहभागी होऊन विजेतेपद मिळविण्याइतका त्याचा खेळ परिपक्व होत आहे. पीटर गेडच्या मार्गदर्शनाचा त्याला फायदा झाला.’’

लक्ष्यच्या भवितव्याविषयी बोलताना विमलकुमार म्हणाले, ‘‘तो त्याच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करत आहे. माजी राष्ट्रीय विजेती सायली गोखले ही सतत त्याच्यासोबत असते. आता आगामी दोन महिन्यांत तो व्हिएतनाम ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेत सहभागी होणार असून, नंतर तो कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतही सहभागी होईल. गेल्या वर्षी लक्ष्यने इंडिया आंतरराष्ट्रीय मालिकेतील स्पर्धेत विजेतेपद आणि थायलंड स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले होते.

लक्ष्यने अंतिम लढतीत विजेत्यास साजेसा खेळ केला. पहिला गेम गमावल्यावर तो जास्त जिद्दीने खेळला. त्याने स्वतःला वाढदिवसानिमित्त विजेतेपदाची भेट दिली आहे. पहिला गेम गमावल्यावर त्याने खेळात केलेला बदल निर्णायक ठरला. त्याला प्रभावी स्मॅश तसेच नेटजवळच्या टचची जोड दिली.
- सायली गोखले, लक्ष्यच्या मार्गदर्शक

Web Title: sports news balgerian open badminton competition