सलग दुसऱ्या पराभवाने महाराष्ट्राच्या मुलांचा मार्ग खडतर

मुकुंद धस
बुधवार, 5 जुलै 2017

हैदराबाद - महाराष्ट्राच्या मुलींनी ३४व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मंगळवारी दुबळा प्रतिस्पर्धी असल्याचा फायदा उठवून मोठ्या विजयासह उपांत्य पूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याचवेळी गच्चीबौली क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 

हैदराबाद - महाराष्ट्राच्या मुलींनी ३४व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मंगळवारी दुबळा प्रतिस्पर्धी असल्याचा फायदा उठवून मोठ्या विजयासह उपांत्य पूर्व फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याचवेळी गच्चीबौली क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 

महाराष्ट्राच्या मुलींनी दुबळ्या राजस्थानचा ७०-३४ असा सहज पराभव केला. उद्या बुधवारी त्यांची गटातील शेवटची लढत गतविजेत्या तमिळनाडू बरोबर होणार असून या लढतीतील विजेता संघ गटविजेता ठरणार आहे. मुलांना मात्र गटातील शेवटच्या सामन्यात पंजाबकडून ५८-७५ अशी हार पत्करावी लागली. मात्र, उद्याच्या पंजाब-तमिळनाडू या सामन्याच्या निकालानंतर त्यांची बाद फेरीतील पुढची वाटचाल ठरणार आहे. राजस्थान विरुद्धच्या एकतर्फी सामन्यात महाराष्ट्रास अजिबात मेहनत करावी लागली नाही. महाराष्ट्राने या सामन्यात आपल्या बहुतेक सर्व खेळाडूंना संधी दिली. 

महाराष्ट्राच्या मुलांनी आज अखेरच्या साखळी लढतीत पंजाबला मध्यंतरापर्यंत चांगली लढत दिली. उत्तरार्धात मात्र उंच प्रिन्सपाल सिंगला सूर गवसल्यानंतर सामना एकतर्फी झाला. विजेत्यांचा धडाका एवढा जबरदस्त होता की महाराष्ट्रास तिसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ ५ गुण नोंदवता आले. याउलट विजेत्यांनी २७ गुण नोंदवून निकाल स्पष्ट केला. रागीट प्रिन्सपाल सिंगने प्रथमार्धात दोन धोकादायक फाऊल केल्याने त्यास विश्रांती देण्यात आली होती. मात्र, त्याच्या अनुपस्थितीचा फायदा महाराष्ट्राला घेता आला नाही. सामन्यात धसमुसळेपणा सुरू झाल्यावर पंचांनी अतिशय कडक भूमिका घेतली आणि त्यामुळे सामन्यात एकूण ५६ फाऊल्सची नोंद झाली. त्यात विजेत्यांचा वाटा ३२ फाऊल्सचा होता. ९५ पैकी केवळ २१ प्रयत्नात यश आलेल्या  सदोष नेमबाजीमुळे महाराष्ट्रास पराभव पत्करावा लागला. संपूर्ण सामना खेळणाऱ्या कमलेश राजभरला तर १७ प्रयत्नात एकच बास्केट करता आला आणि त्याच्याकडून अनेक वेळा चेंडूचा ताबा विजेत्यांकडे गेला. परंतु, त्याला विश्रांती देण्यात आली नाही. उंचपुऱ्या विजेत्यांना रोखण्याचा प्रयत्नात केलेल्या वैयक्तिक ५ फाउलमुळे महाराष्ट्राच्या अर्जुन यादव, प्रीतीश कोकाटे आणि तनय थत्तेला मैदान सोडावे लागले.

निकाल : मुली : महाराष्ट्र : ७० (खुशी डोंगरे २१, सुझान पिंटो १६) विजयी राजस्थान ३४ (शताक्ष राठोड १४, अक्षता १०) मुले : महाराष्ट्र ५८ (तनय थत्ते २९, अर्जुन यादव १४, ओम पवार १२) पराभूत पंजाब ७५ (प्रिन्सपाल सिंग २०, मणी १५, राजन १३)

Web Title: sports news basketball