गरिबीला ‘पंच’ देत अक्षयचे सुवर्ण लक्ष्य

ज्ञानेश भुरे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - त्याची जिद्द खेळामध्ये मोठे व्हायची; पण ते स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी. त्यामुळेच गरिबीला जिद्दीचा ‘पंच’ देऊन तो देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याची आस बाळगून आहे. त्यासाठी मेहनत करण्याची तयारी आहे पुण्याचा उदयोन्मुख बॉक्‍सर अक्षय मरे याची.

पुणे - त्याची जिद्द खेळामध्ये मोठे व्हायची; पण ते स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी. त्यामुळेच गरिबीला जिद्दीचा ‘पंच’ देऊन तो देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याची आस बाळगून आहे. त्यासाठी मेहनत करण्याची तयारी आहे पुण्याचा उदयोन्मुख बॉक्‍सर अक्षय मरे याची.

सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल वसाहतीत दहा बाय दहाच्या खोलीत आई, वडील आणि दोन भावांसह अक्षय राहतो. सरस्वती विद्या मंदिर प्रशालेत शिकत असताना खेळात मिळालेली पारितोषिके त्याला प्रेरित करत होती; पण पुढे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी बॉक्‍सिंग खेळणाऱ्या मोठ्या भावाच्या मित्राने अक्षयला त्याची देहबोली बघून बॉक्‍सिंगची निवड करण्याचा सल्ला दिला. मोठ्या भावानेही त्याला दुजोरा दिला. अक्षयने त्याचा शब्द राखला आणि नेहरू स्टेडियमवर ज्येष्ठ बॉक्‍सिंग प्रशिक्षक टी. जे. नाईक यांच्याकडे बॉक्‍सिंगचे धडे गिरविले. काही कारणांमुळे त्याला तो क्‍लब सोडावा लागला. नंतर तो भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य बॉक्‍सिंग स्टेडियममध्ये सुरू असलेल्या क्‍लबमध्ये विजय गुजर यांच्याकडे तो दाखल झाला. नाईक सरांनी पाया भक्कम केल्यामुळे गुजर सरांकडे त्याच्या बॉक्‍सिंगला फायनल ‘टच’ मिळाला. अक्षयची तयारी पाहून भावाने शिक्षण सोडले आणि दुसरा भाऊ तुषार आणि अक्षयला शिकविणे हेच उद्दिष्ट ठेवले. सकाळी दूध टाकणे, पेपर टाकणे अशी कामे करून भाऊ अक्षयचा प्रशिक्षणाचा खर्च भागवतो.

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कुमार, सब-ज्युनियर स्पर्धा खेळल्यानंतर अक्षयने गेल्यावर्षी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक मिळविले. राष्ट्रीय सराव शिबिरासाठीदेखील त्याची निवड झाली; पण समोर अनुभवी बॉक्‍सर समोर त्याला निवड चाचणीत उपांत्य फेरीत अपयश आले. त्यामुळे त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही; पण त्याने जिद्द सोडली नाही. तो म्हणाला,‘‘भारतासाठी खेळण्याची संधी मला कधीतरी मिळेलच आणि ती मी साधणार. राष्ट्रीय पातळीवर १९९३ मध्ये मनोज पिंगळे याच्यानंतर महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळालेले नाही. हा इतिहास मला बदलायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मला सुवर्णपदक मिळवायचे आहे.’’ बॉक्‍सिंगच्या स्पर्धा, सराव यामुळे अभ्यासावर थोडाफार परिणाम होत असला तरी, तो सहन करून अक्षय सकाळी पेपर टाकून आपला दिवस सुरू करतो, मग पुजारी सरांकडे फिटनेस झाल्यावर दुपारच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी गुजर सरांकडे सराव असा त्याचा नित्यक्रम आहे.

अक्षय म्हणाला,‘‘पडेल ते काम करण्याची तयारी आहे; पण सरावाचा खर्च भागवण्यासाठी सरकारने थोडीफार मदत करणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाताना होणारे प्रशिक्षिण शिबिर पुरेसे नाही. त्याचा कालावधी अधिक असल्यास अधिक चांगला सराव करून स्पर्धेत मोठ्या तयारीने उतरता येईल. त्यासाठी राज्य सरकारने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.’’

व्यावसायिक बॉक्‍सिंगमधून मी वैयक्तिक मोठा होईन. देशासाठी खेळेन तेव्हा मी तर मोठा होईनच, पण बरोबरीने देशाचीही शान उंचावेल.
- अक्षय मरे

अक्षयमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची क्षमता आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळायला हवे. सरकारने त्याला नोकरी देण्यासंदर्भात विचार करायला हवा. 
- विजय गुजर, अक्षयचे प्रशिक्षक

Web Title: sports news boxer akshay mare