बॉक्‍सिंग खेळाडूंचा सहभाग संकटात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस जाण्यापूर्वी प्रत्येकास काय करावे आणि काय करू नये, हे स्पष्टपणे सांगितले होते. सिरींज वापरण्याची खरोखरच आवश्‍यकता होतीच, तर त्यांनी पूर्वपरवानगी घ्यायला हवी होती. अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात. याबाबत अजूनही पूर्ण माहिती आलेली नाही.
- भारतीय ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी

नवी दिल्ली/गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंचा सहभाग संकटात आला आहे. ऑस्ट्रेलिया उत्तेजक प्रतिबंधक पथकास भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या रूमबाहेर सिरींज आढळल्याने भारताच्या सर्व बॉक्‍सिंग खेळाडूंची उत्तेजक चाचणी झाली आहे. या स्पर्धेच्या वेळी नो नीडल पॉलिसी असल्यामुळे भारतीय खेळाडूंवर कठोर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. इतके सगळे झाल्यानंतरही भारतीय व्यवस्थापन यामध्ये आपल्या बॉक्‍सिंग खेळाडूंचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत आहे. 

आमच्या पथकातील एकाला रस्त्यावर पाण्याची बाटली पडलेली दिसली. त्यात सूया होत्या. त्या सिरींज असल्याचे माझ्या लक्षात आले. आम्ही ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवली. आम्ही ती बाटली उघडलीही नव्हती, असे भारतीय बॉक्‍सिंग संघाचे व्यवस्थापक अजय नारंग यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या बातम्यांनुसार मात्र तपासणी पथकाला या सिरींज आढळल्या आहेत. 

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय पथकातील बाराही बॉक्‍सिंग खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात आली आहे. उत्तेजक चाचणीचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्‍यता आहे. हा अहवाल उद्‌घाटन सोहळ्यापूर्वीच येईल. दोषी ठरल्यास खेळाडूंवर कठोर कारवाई होऊ शकेल, असे एका भारतीय पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी सिरींज आमच्या रूममध्ये आढळलेल्या नाहीत. आमच्या डॉक्‍टरांनी त्या वैद्यकीय आयुक्तांकडे दिल्या आहेत. त्या वेळी कोणतीही चर्चा झाली नव्हती. काही खेळाडूंची चाचणी झाली, हे खरे आहे; पण स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडूंची चाचणी होते. ही नियमितपणे होणारी प्रक्रिया आहे, असे एका भारतीय पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय खेळाडूंवर प्रतिबंध?
भारतीय क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले किंवा त्याच्या संशयावरून कारवाई झाल्यास देशाची बदनामी होईल, याची जाणीव भारतीय पथकास झाली आहे. आता रात्री दहापूर्वी क्रीडाग्राममध्ये परतण्याचे आदेश खेळाडूंना देण्यात आले असल्याचे वृत्त आहे. 

नो सिरींज पॉलिसी 
वैद्यकीय पथक या सिरींजची तपासणी करीत आहे. यात उत्तेजकांचा वापर केल्याचे आढळले नाही, तरीही नो नीडल पॉलिसीनुसार कारवाई होऊ शकेल. ऑस्ट्रेलिया उत्तेजक प्रतिबंधक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबत नियमानुसार कारवाई होऊ शकते, असे संयोजकांनी स्पष्ट केले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हे प्रकरण निकालात काढले जाईल, अशी ग्वाही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रेवेमबर्ग यांनी दिली. सुईचा वापर वैद्यकीय कारणास्तव करण्यात आला असला, तरीही कारवाई होऊ शकेल. नो नीडलबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: sports news boxing player in problem