‘चॅंपियन्स’चा आजपासून महासंग्राम

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

लंडन - ‘मिनी विश्‍वकरंडक’ म्हणून पाहिल्या जात असलेल्या चॅम्पियन्स करंडक मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम उद्यापासून सुरू होत आहे. भारत या स्पर्धेचे गतविजेते आहेत; तर ऑस्ट्रेलियाकडेही संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही संघांबाबत मैदानाबाहेर काही घटना घडत असल्या, तरी या दोन्ही संघांना अधिक पसंती दिली जात आहे.

एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या आठ संघांची ही स्पर्धा १८ दिवसांत संपणार आहे. प्रत्येकी चार संघांचे दोन गट असल्यामुळे प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार आहे. त्यामुळे एखादा पराभवही मुळावर येऊ शकतो. परिणामी प्रत्येक सामन्यात शर्थ करावी लागणार आहे. दोन्ही गटांतील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.

यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातून उद्यापासून स्पर्धेचे रणशिंग फुंकले जाईल, पण ४ जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयसीसीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने प्रत्येक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे.

प्रत्यक्ष मैदानावरचा रणसंग्राम सुरू होत असताना संभाव्य विजेते म्हणून पसंती देत आलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांबाबत मैदानाबाहेर घडामोडी घडत आहेत. भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडूंमध्ये बेबनाव झाल्याचे वृत्त आहे; तर कमी मानधन करारावरून सुरू असलेला ऑस्ट्रेलिया खेळाडू आणि त्यांच्या मंडळाबरोबरचा वाद चव्हाट्यावर आला आहे. पण या घटना मागे सारून दोन्ही संघांतील खेळाडू मैदानावर सर्वस्व बहाल करण्यास सज्ज झाले आहेत.

भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे आशियातील चार संघ खेळणार आहेत. पाकिस्तानची धुरा प्रामुख्याने नवोदित खेळाडूंवर आहे; मात्र इंग्लिश वातावरणात त्यांची वेगवान गोलंदाजी प्रभावी ठरू शकते. बांगलादेश आणि श्रीलंका यांना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.

Web Title: sports news Champions Trophy