नवोदितांच्या आव्हानामुळे ज्येष्ठांचा कस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - भारतातील अनुभवी ज्येष्ठ नेमबाजांसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही महत्त्वाची असेल. नवोदितांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्यामुळे त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असेल, असे मत बुजुर्ग नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केले; तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जास्त खडतर आणि महत्त्वाच्या असल्या, तरी यांसारख्या बहुविध क्रीडा स्पर्धेतील कामगिरीवर जास्त लक्ष असल्यामुळे दडपणही जास्त असते, याकडे अव्वल बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटने लक्ष वेधले.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी जितू राय, गगन नारंग, हिना सिद्धू या नेमबाजांचे भारतीय संघातील स्थान पक्के समजले जात असे, पण त्यांना नवोदित नेमबाजांनी राष्ट्रीय स्पर्धेपासून धक्का द्यायला सुरवात केली आहे, तसेच विश्‍वकरंडक स्पर्धेतही आपले वर्चस्व राखले. ‘‘राष्ट्रकुल क्रीडासारख्या बहुविध स्पर्धांमध्ये दडपणाचा कस लागतो. त्या वेळी अनुभव मोलाचा ठरतो. नवोदितांना हा अनुभव मिळणार आहे. राष्ट्रकुल नेमबाजी भारतासाठी पूर्वीइतकी सोपी नसली, तरी भारतीय नक्कीच वर्चस्व राखतील. गेल्या काही स्पर्धांमध्ये आपल्या नेमबाजांनी राष्ट्रकुलातील देशांना मागे टाकले आहे. एकंदरीत विचार केल्यास ही स्पर्धा आपल्यासाठी स्टेपिंग स्टोन असेल, असे अंजलीने सांगितले.

भारतास एकेरीतच नव्हे, तर दुहेरीतही यशाची संधी आहे. पुरुष दुहेरीत सात्विकराज-चिराग शेट्टी आणि महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांच्याकडून सुवर्णपदकाची आशा बाळगणे चुकीचे नसेल, ते सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. अर्थात, सिंधू, साईना असल्यामुळे अंतिम फेरी थेट भारतीयांतच होईल, अशीही आशा बाळगू शकतो. राष्ट्रकुलपेक्षा जास्त खडतर स्पर्धांत भारतीय बॅडमिंटनपटूंनी यश मिळवले असले, तरी या स्पर्धेतील यशाकडे जास्त लक्ष असते, त्यामुळेच ही स्पर्धा महत्त्वाची असते, असे अपर्णाने सांगितले.

हॉकीत आशिया स्पर्धेपेक्षा खडतर आव्हान
भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ आशियाई विजेते असले, 
तरी राष्ट्रकुलातील आव्हान जास्त खडतर असते. पुरुषांमध्ये ऑस्ट्रेलिया ताकदवान आहे, पण त्यानंतरच्या पदकासाठी भारत, ब्रिटन आणि न्यूझीलंड यांच्यात कडवी चुरस असेल, पण  महिलांच्या स्पर्धेबाबत सांगणे अवघड आहे. महिलांनी चीन, जपान, कोरिया यांना मागे सारत भारताने बाजी मारली. रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ कौशल्यात कमी नव्हता, पण तंदुरुस्तीत कमी पडला होता. तंदुरुस्ती गेल्या काही महिन्यांत उंचावली आहे. त्यामुळेच भारतीय हॉकी संघ नक्कीच पदकाच्या शर्यतीत आहे, असे भारताची माजी हॉकी कर्णधार वीरेन रस्किन्हा यांनी सांगितले.

Web Title: sports news Commonwealth Games