वर्ल्डकप अपयशाची ऑस्ट्रेलियाकडून परतफेड

वर्ल्डकप अपयशाची ऑस्ट्रेलियाकडून परतफेड

बडोदा - महिलांच्या विश्‍वकरंडक उपांत्य सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाची पुरेपूर परतफेड करणारा खेळ ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा आठ विकेट आणि तब्बल १०७ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली.

कर्णधार मिताली राजच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर कोलमडली. जेमतेम २०० धावा करता आल्या आणि हे आव्हान पाहुण्या संघाने ३२.१ षटकांतच पार केले. २०२ पैकी निकोल बोल्टन हिने एकटीने १०० धावा केल्या.

आठ महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यानंतर प्रथमच हे दोन्ही संघ आमने-सामने आले; परंतु भारतीयांना घरच्या मैदानावर खेळत असतानाही कामगिरी उंचावता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अमांडा वेलिंटन २४ धावांत ३; तर डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेनने ३० धावांत ४ विकेट मिळवून भारतीय फलंदाजीची दाणादाण उडवली. 

मिताली राजच्या अनुपस्थितीत भारताची मधली फळी कोलमडली. पूनम राऊत आणि स्मृती मंधाना यांनी ३८ धावांची सलामी दिली होती; परंतु बघता बघता भारताची ७ बाद ११३ अशी घसरगुंडी उडाली. मितीलीऐवजी संधी देण्यात आलेली मुंबईची जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर तर एकेरी धावात बाद झाल्या. 

३२ व्या षटकात सात फलंदाज बाद झाल्यावर भारताला दीडशे धावांचा टप्पा अश्‍यक वाटत होता; परंतु सुषमा वर्मा आणि पूजा वस्त्रकर यांनी ७६ धावांची भागीदारी केली; त्यामुळे दोनशे धावांपर्यंत मजल मारता आली.

ज्या खेळपट्टीवर पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज यशस्वी ठरल्या होत्या, तेथे भारतीय फिरकीपटू मात्र अपयशी ठरल्या. त्याअगोदर वेगवान गोलंदाजांनीही निराशा केली. अवघे दोनच फलंदाज त्या बाद करू शकल्या; पण त्यापेक्षा बोल्टनने १०१ चेंडूंत १२ चौकारांसह शतकी तडाखा देत दोन्ही संघातला फरक स्पष्ट केला.

संक्षिप्त धावफलक ः ५० षटकांत सर्व बाद २०० (पूनम राऊत ३७, सुषमा वर्मा ४१, पूजा वस्त्रकार ५१ -५६ चेंडू ७ चौकार, १ षटकार, वेलिंग्टन ३-२४, जोनासेन ४-३०) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ३२.१ षटकांत २ बाद २०२ (निकोल बोल्टन नाबाद १०० -१०१ चेंडू, १२ चौकार, अलायसा हिली  ३८ -२९ चेंडू, ६ चौकार, १ षटकार)     
दुसरा सामना ः गुरुवार, १५ मार्च.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com