दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

पीटीआय
मंगळवार, 13 मार्च 2018

पोर्ट एलिझाबेथ (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळविला. शिस्तभंगाची कारवाई विसरून जात भन्नाट कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सामन्यात १५० धावांत ११ गडी बाद केले. त्याच्यावरील कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आनंदावर मात्र विरजण पडले. 

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सोमवारी सकाळी २३९ धावांत संपुष्टात आला. रबाडाने ५४ धावांत सहा गडी बाद केले. विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ १०१ धावांचे आव्हान राहिले. दक्षिण आफ्रिकेने ४ बाद १०२ धावा केल्या.

विजयासाठी १०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरवात चिंताजनक झाली होती. एल्गार लवकर बाद झाला. मार्करमलाही मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. त्यानंतर हशिम आमला आणि डिव्हिलर्स यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, दोघेही विजयापर्यंत टिकू शकले नाही. आमलाला कमिन्सने, तर डिव्हिलर्सला लियॉनने बाद केले. थेऊनिस डी ब्रुईन याने विजयी धाव घेत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्यापूर्वी आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित पाच फलंदाजांना केवळ ५९ धावांचीच भर घालता आली. अखेरच्या पाचपैकी तीन फलंदाजांना रबाडाने बाद केले. रबाडाने कारकिर्दीत २८ सामन्यांत चौथ्यांदा सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याची कामगिरी केली. रबाडाची कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरत असतानाच त्याच्या डोक्‍यावर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार होती. एकाच सामन्यात दोन वेळा त्याच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप असून, सामना संपल्यावर त्याच्यावरील कारवाईची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

संक्षिप्त धावफलक ः
ऑस्ट्रेलिया २४३ आणि २३९ (उस्मान ख्वाजा ७५, मिशेल मार्श ४५, टी पेनी नाबाद २८, कागिसो रबाडा ६-५४, लुंगी एन्गिडी २-२४, केशव महाराज २-९०) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका ३८२ आणि ४ बाद १०२ (डिव्हिलर्स २८, हशिम आमला २७, टी डी ब्रुईन नाबाद १५, नॅथन लियॉन २-४४)

Web Title: sports news cricket australia vs south africa