अनुकूल वातावरणात फलंदाजी बहरली

पीटीआय
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या.

कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या.

महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमारने श्रीलंकेची पहिल्या डावातील आघाडी सव्वाशेपर्यंत मर्यादित ठेवली; मात्र पिछाडी असूनही राहुल आणि धवनने प्रतिआक्रमण करत श्रीलंकेला वर्चस्वाची संधीही दिली नाही. अर्थात, स्वच्छ सूर्यप्रकाश तसेच फलंदाजीस जास्त साथ देणारी खेळपट्टीही भारतीयांच्या पथ्यावर पडली होती. श्रीलंकेच्या मध्यमगती गोलंदाजांनी भारतीयांना स्थिरावण्यास मदत केली. कोलकत्यातील दमट वातावरणात आपले गोलंदाज जास्त थकतील हा विचार करून श्रीलंकेने फिरकी काहीशी लवकरच सुरू केली; पण खेळपट्टी कोणतीही साथ देत नसल्याने त्याचा फलंदाजांना फायदाच झाला.

मनगटाचा छान वापर करणारा राहुल आणि पुढे सरसावत हल्ला करणारा धवन यांनी श्रीलंकेस वर्चस्वाची कोणतीही संधी दिली नाही. खर तर हेराथ हा दुसऱ्या डावात जास्त प्रभावी ठरतो. श्रीलंकेने त्याला २९ षटकेही दिली; पण त्याचा कोणताही प्रभाव पडला नाही. खेळ संपण्याच्या सुमारास कमी प्रकाशात धवन चकला आणि त्या यशावरच श्रीलंकेस समाधान मानावे लागले. 

सकाळच्या सत्रात श्रीलंका फलंदाज आक्रमकच होते; मात्र या खेळपट्टीवर चेंडू अचानक मूव्ह होत असल्याचा धोका असल्याने त्याच्या रेषेत खेळणे धोकादायक ठरते. त्यामुळे त्यांनी चेंडूचा पाठलाग करण्यास पसंती दिली होती. हे दुहेरी अस्त्र होते. त्यामुळे डिकवेला आणि चंडीमल यांना पूर्ण वर्चस्वानंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारतीय श्रीलंकेची आघाडी पन्नाशीच्या आसपास राखणार असेच वाटत होते; पण हेराथने आडव्या बॅटने हल्ला केला. चेंडूच्या टप्प्याचा अंदाज घेत त्याने चेंडू कट अथवा पूल केला. तो बाद झाल्यावर लंकेचा डाव फारवेळ चालला नाही; पण त्याने संघाचा आत्मविश्वास शतकी आघाडी देत नक्कीच उंचावला होता.

लक्षवेधक
२०१० नंतर प्रथमच कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीयांची शतकी सलामी. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे.
लोकेश राहुलने गेल्या ११ डावांत नवव्यांदा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या
गेल्या नऊ डावांत राहुलची आठ अर्धशतके
भारताच्या मध्यमगती गोलंदाजांनीच सर्व दहा विकेट घेण्याची मायदेशातील ही तिसरी वेळ
यापूर्वी हे १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबादला. सर्वांत प्रथम १९८१-८२ च्या इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत
एकाच डावात भारताच्या तीन मध्यमगती गोलंदाजांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा प्रसंग १९८६ नंतर भारतात प्रथमच. एकंदरीत ही चौथी वेळ
२०१० नंतर श्रीलंकेने प्रथमच भारताविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. गॉली येथील या कसोटीत श्रीलंकेचा विजय
यानंतरच्या आठपैकी सहा कसोटींत भारताचा विजय; तर एका कसोटीत श्रीलंकेची सरशी
भारताचा चेतेश्‍वर पुजारा कसोटीत पाचही दिवस फलंदाजी करणार. अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्‍वातील नववा, तर भारताचा तिसरा फलंदाज
भारताकडून यापूर्वी एम.एल. जयसिंहाने १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि रवी शास्त्रीने १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकत्यात अशी कामगिरी केली.

धावफलक
भारत, पहिला डाव - १७२
श्रीलंका, पहिला डाव -
तिसऱ्या दिवसाच्या ४ बाद १६६ वरून, दिनेश चंडीमल झे. साहा गो. शमी २८, डिकवेला झे. कोहली गो. शमी ३५, शनाका पायचीत गो. भुवनेश्‍वर ०, पेरेरा झे. साहा गो. शमी ५, हेराथ झे. शमी गो. भुवनेश्‍वर ६७ (१०५ चेंडू, ९ चौकार), लकमल त्रि. गो. शमी १६, गमगे नाबाद ०, अवांतर - ९, एकूण - ८३.४ षटकांत सर्व बाद २९४.

बाद क्रम - १-२९, २-३४, ३-१३३, ४-१३८, ५-२००, ६-२०१, ७-२०१, ८-२४४, ९-२९०.

गोलंदाजी - भुवनेश्वर कुमार २७-५-८८-४, महंमद शमी २६.३-५-१००-४, उमेश यादव २०-१-७९-२, आर. अश्‍विन ८-२-१३-०, विराट कोहली १.१-०-५-०, रवींद्र जडेजा १-०-१-०.

भारत, दुसरा डाव - केएल राहुल खेळत आहे ७३ (११३ चेंडू, ८ चौकार), शिखर धवन झे. डिकवेला गो. शनाका ९४ (११६ चेंडू, ११ चौकार व २ षटकार), चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे २, अवांतर - २, एकूण - ३९.३ षटकांत १ बाद १७१.

बाद क्रम - १- १६६

गोलंदाजी - लकमल ८-०-२९-०, गामागे ९-०-४७-०, शनाका ९.३-१-२९-१, पेरेरा १०-१-४१-०, हेराथ ३-०-२५-०.

Web Title: sports news cricket india