फॉलोऑननंतर श्रीलंकेची झुंज

फॉलोऑननंतर श्रीलंकेची झुंज

कोलंबो  - डोळ्यासमोर पत्त्यांचा बंगला कोलमडून पडावा तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या ४९.४ षटकांत १८३ धावांत गडगडला. ४३९ धावांची प्रचंड आघाडी आणि उपहाराला मिळालेल्या विश्रांतीमुळे विराटने लंकेला फॉलोऑन दिला. कोलंबो कसोटीही भारतीय संघ लवकर खिशात घालणार असे वाटू लागले असताना दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांनी झुंज दिली. कुशल मेंडीसने आक्रमक शतक करताना करुणारत्नेसह १९१ धावांची भागीदारी केली. तिसरा दिवस संपताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात २ बाद २०९ धावा उभारल्या होत्या. भारतीय संघाकडे अजून २३० धावांची आघाडी कायम असल्याने श्रीलंकेला सामना वाचवायला भीमकाय प्रयत्न करावे लागतील.

तिसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर दिनेश चंडीमल जडेजाला स्वीप मारायच्या प्रयत्नात झेलबाद झाला.  नंतर लगेच उमेश यादवला तिरक्‍या बॅटने मारायच्या प्रयत्नात मेंडीस बाद झाला. अनुभवी मॅथ्यूजने २ चौकार व २ षटकार मारून आक्रमक धोरण अवलंबले. अश्‍विनने मॅथ्यूजला बाद केले. ज्यात गोलंदाजापेक्षा अफलातून झेल पकडणाऱ्या पुजाराला श्रेय द्यावे लागेल. मॅथ्यूजने अश्‍विनचा वळणारा चेंडू डाव्या बाजूला मारला असताना लेग स्लीपमधे उभ्या असलेल्या पुजाराने डावीकडे झेपावत एका हातात जमिनीपासून एका इंचावर झेल पकडला. मॅथ्यूज बाद झाल्यावर बाकीचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले. शमी आणि जडेजाने दोन फलंदाजांना बाद केले, तर तळातल्या फलंदाजांना बाद करणे अश्‍विनकरता सोपे गेले. डिकवेलाने अर्धशतक करताना चमक दाखवली पण त्याने अत्यंत खराब फटका मारायच्या प्रयत्नात शमीला दिलेली विकेट श्रीलंकन फलंदाजांकडे संयमाचा अभाव स्पष्ट दाखवणारी ठरली. भारताकडून अश्‍विनने ६९ धावांत ५ बळी मिळवून फिरकीची कमाल दाखवली.

लंकेच्या दुसऱ्या डावाची सुरवात खराब झाली. अनुभवी थरंगाचा यादवने त्रिफळा उडविला. परत एकदा श्रीलंकन फलंदाजी कोलमडणार वाटत असताना करुणारत्ने आणि मेंडीसने आक्रमक फलंदाजी केली. खेळपट्टी फिरकीला साथ देत असल्याने अश्‍विन-जडेजासमोर हे दोघे बऱ्याचवेळा चकले, पण त्यांनी मोठे फटके मारण्याचे धाडस कमी केले नाही. सातत्याने चौकार मारले गेल्याने कोहलीला थोडी बचावात्मक फिल्डिंग लावणे भाग पडले. 

२००० धावा आणि २५० विकेट कमीत कमी कसोटीत पूर्ण करणारा अश्‍विन पहिला खेळाडू. या अगोदरचा विक्रम न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली (५४ कसोटी) यांच्या नावावर होता.

डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये कमी कसोटीत सर्वात जलद १५० विकेट मिळवणारा रवींद्र जडेजा पहिला गोलंदाज. त्याने ३२ कसोटीत ही कामगिरी केली.

याअगोदर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सनने ३४ कसोटीत ही कामगिरी केली होती.

करुणरत्ने आणि कुशल मेंडिस यांनी केलेली १९१ धावांची भागीदारी श्रीलंकेकडून दुसऱ्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी. या अगोदर जयसूर्या-महानामा यांनी भारताविरुद्ध १९९७ मध्ये ५७६ धावांची भागी केली होती.

धावफलक
भारत - पहिला डाव - ९ बाद ६२२ घोषित
श्रीलंका - पहिला डाव - दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. अश्‍विन २५, उपुल थरांगा झे. राहुल गो. अश्‍विन ०, कुशल मेंडिस झे. कोहली गो. यादव २४, दिनेश चंडिमल झे. पंड्या गो. जडेजा १०, अँजेलो मॅथ्यूज झे. परेरा गो. अश्‍विन २६, निरोशन डिकवेला त्रि. गो. शमी ५१, धनंजया डिसिल्वा त्रि. गो. जडेजा ०, दिलरुवान परेरा त्रि. गो. अश्‍विन २५, रंगाना हेराथ त्रि. गो. शमी २, मलिंदा पुष्पकुमारा नाबाद १५, नुवान प्रदीप त्रि. गो. अश्‍विन ०, अवांतर ५, एकूण ४९.४ षटकांत सर्व बाद १८३

बाद क्रम - १-०, २-३३, ३-६०, ४-६४, ५-११७, ६-१२२, ७-१५०, ८-१५२, ९-१७१. गोलंदाजी - शमी ६-१-१३-२, अश्‍विन १६.४-३-६९-५, जडेजा २२-६-८४-२, यादव ५-१-१२-१

श्रीलंका, दुसरा डाव - दिमुख करुणारत्ने खेळत आहे ९२, उपुल थरांगा त्रि. गो. यादव २, कुशल मेंडिस झे. साहा गो. पंड्या ११०, पुष्पकुमारा खेळत आहे २, अवांतर ३, एकूण ६० षटकांत २ बाद २०९. बाद क्रम - १-७, २-१९८

गोलंदाजी - यादव ९-२-२९-१, अश्‍विन २४-६-७९-०, शमी ६-२-१३-०, जडेजा १६-२-७६-०, पंड्या ५-०-१२-१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com