भारताची अंतिम फेरीत धडक

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

कोलंबो - सलग तिसरा विजय मिळवून भारताने तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताने बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. सूर सापडलेल्या रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांची जोरदार टोलेबाजी त्यानंतर वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी यामुळे भारताचा विजय साकारला.

कोलंबो - सलग तिसरा विजय मिळवून भारताने तिरंगी ट्‌वेंटी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताने बुधवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. सूर सापडलेल्या रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांची जोरदार टोलेबाजी त्यानंतर वॉशिंग्टनची सुंदर गोलंदाजी यामुळे भारताचा विजय साकारला.

अंतिम फेरीतील प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला सूर सापडला. ६१ चेंडूंत त्याने उभारलेली ८९ धावांची खेळी, त्याचबरोबर फॉर्मात आलेल्या सुरेश रैनाचा ३० चेंडूंतील ४७ धावांचा तडाखा यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा उभारल्या. त्यानंतर बांगलादेशला ६ बाद १५९ धावांत रोखले.

बांगलादेशचा प्रमुख आशास्थान मुशफिकर रहीमने पुन्हा एकदा नाबाद ७२ धावांची खेळी करून प्रतिकार कायम ठेवला. यातच  उनाडकटऐवजी संधी देण्यात आलेल्या महंमद सिराजने स्वैर गोलंदाजी करून चार षटकांत दिलेल्या तब्बल ५० धावा यामुळे बांगलादेशने अखेरपर्यंत प्रयत्न केले; परंतु डावाच्या सुरवातीला ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने मिळविलेले तीन बळी भारताची पकड भक्कम करणारे ठरले होते. 

या स्पर्धेत आत्तापर्यंत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकलेला आहे. आजचा दिवस अपवाद ठरला. कारण सुरवातीला रोहित आणि शिखर धवन यांनी दिलेली १० षटकांतील ७० धावांची सलामी त्यानंतर जम बसवण्यास वेळ घेतल्यानंतर बरसलेला रैना. रोहित आणि रैना यांनी ११ धावांच्या सरासरीने १०२ धावांची भागीदारी केली. शतकाच्या जवळ आलेला रोहित अखेरच्या षटकात बाद झाला. 

बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध दोनशेच्या पलीकडची धावसंख्या पार केली होती. त्यामुळे आजही त्यांच्याकडून प्रयत्न होणार हे अपेक्षित होते; पण वॉशिंग्टनने सुरवातीलाच दोन धक्के दिले. त्यानंतर धोकादायक तमिम इक्‍बालला बाद केले. ४ बाद ४० अशी अवस्था झालेल्या बांगलादेशला पुढची काही षटके डाव सावरण्यासाठी खर्ची करावी लागली. मुशफिकर रहीम एका बाजूने प्रयत्न करत होता; परंतु त्याची मजल भारताची धावसंख्या पार करण्यापर्यंत गेली नाही.

संक्षिप्त धावफलक ः 
भारत ः २० षटकांत ३ बाद १७६ (रोहित शर्मा ८९- ६१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, शिखर धवन ३५- २७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सुरेश रैना ४७- ३० चेंडू, ५ चौकार, २ षटकार, रुबेल हुसेन २-२७) वि. वि. बांगलादेश ः ६ बाद १५९ (तमिम इक्‍बाल २७- १९ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, मुशफिकर रहीम नाबाद ७२- ५५ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, वॉशिंग्टन सुंदर ३-२२, चहल १-२१)

Web Title: sports news cricket T-20 india srilanka Colombo