esakal | दुहेरीतील पराभवाने भारत पिछाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

दुहेरीतील पराभवाने भारत पिछाडीवर

दुहेरीतील पराभवाने भारत पिछाडीवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कॅनडाच्या डॅनिएल नेस्टर-वासेक पोस्पिसीलचा सफाईदार विजय

एडमाँटन (कॅनडा) - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटात खेळण्याच्या भारताच्या आशांना धक्का बसला. कॅनडाविरुद्ध सुरू असलेल्या प्ले-ऑफ लढतीत भारताला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता कॅनडाने २-१ अशी आघाडी घेतली असून, भारताच्या आशा परतीच्या एकेरी लढतींवर अवलंबून राहतील.

कॅनडाच्या डॅनिएल नेस्टर आणि वासेक पोस्पिसील जोडीने दुहेरीच्या लढतीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि पूरव राजा जोडीवर सफाईदार विजय मिळविला. दोन तास ५२ मिनिटे रंगलेली लढत कॅनडाच्या जोडीने चार सेटच्या लढतीत जिंकली. भारताला आता परतीच्या दोन्ही एकेरीच्या लढती जिंकाव्या लागणार आहेत. 

दुहेरीच्या लढतीत पोस्पिसीलचा खेळ लक्षवेधक ठरला. त्याचे बेसलाइनवरील रिटर्न्स आणि नेटवरील अचूक प्लेसमेंट भारतीय जोडीचा कस पाहणारे ठरले. त्याच्या खेळाने भारतीय जोडी सातत्याने अडचणीत सापडली.

व्यावसायिक टेनिसमध्ये दिवीज शरणच्या साथीत दुहेरीमध्ये प्रगती करणाऱ्या पूरव राजाने आपल्या खेळाने अपेक्षा निश्‍चितपणे उंचावल्या. त्याचा नेटवरील खेळ आणि व्हॉलीज सुरेख झाल्या; पण सर्व्हिस आणि बेसलाइनवर त्याचा खेळ परिपूर्ण  नसल्याचा भारताला फटका बसला. ऐनवेळी संघात स्थान मिळालेल्या राजाची सर्व्हिस पाच वेळा भेदली गेली. यातही पहिल्या दोन सेटमध्ये ५-६ अशा स्थितीत दोन वेळा तो सर्व्हिस राखू शकला नाही. 

बोपण्णालाही आज त्याच्या सर्व्हिसने साथ दिली नाही. त्याच्याकडून पाच डबल फॉल्ट झाले. भारताकडून तब्बल १२ डबल फॉल्ट्‌स झाले. हाच सदोष खेळ लढतीतील फरक स्पष्ट करणारा होता.

निकाल
कॅनडा २ भारत १
रोहन बोपण्णा-पूरव राजा पराभूत वि. डॅनिएल नेस्टर-वासेक पोस्पिसील ५-७, ५-७, ७-५, ३-६

loading image