एलानी ‘वेगवान’; शॉनेचेही सुखद यश

पीटीआय
रविवार, 3 सप्टेंबर 2017

ब्रुसेल्स - डायमंड लीग ॲथलेटिक्‍स मालिकेची सांगता करणाऱ्या अंतिम फेरीत ‘वेगवान धावपटू’ हा किताब महिला विभागात जमैकाच्या एलानी थॉमसन हिने पटकावला. बहामाच्या शॉने मिलर-युईबो हिने ४०० मीटर शर्यत जिंकली. लंडनमधील जागतिक स्पर्धेतील निराशेनंतर या दोघींसाठी हे यश सुखद ठरले.

ब्रुसेल्स - डायमंड लीग ॲथलेटिक्‍स मालिकेची सांगता करणाऱ्या अंतिम फेरीत ‘वेगवान धावपटू’ हा किताब महिला विभागात जमैकाच्या एलानी थॉमसन हिने पटकावला. बहामाच्या शॉने मिलर-युईबो हिने ४०० मीटर शर्यत जिंकली. लंडनमधील जागतिक स्पर्धेतील निराशेनंतर या दोघींसाठी हे यश सुखद ठरले.

एलानी १०० व २०० मीटरमधील यशासह दुहेरी ऑलिंपिक विजेती आहे. या मालिकेत तिने सलग दुसऱ्यांदा ‘डायमंड ट्रॉफी’ जिंकली. किंग्जस्टनमध्ये तिने १०.७१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. त्यामुळे तिच्याकडून आशा होत्या, पण लंडनमध्ये तिला पदक मिळविता आले नव्हते. गेल्या आठवड्यात झुरीचमध्ये तिने २२ सेकंद वेळेसह २०० मीटर शर्यत जिंकली. त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास उंचावला. तिने १०.९२ सेकंद वेळेसह बाजी मारली. आयव्हरी कोस्टची मारी-जोस्सी ता लोऊ (१०.९३) दुसरी, तर नायजेरियाची ब्लेसिंग ओकाग्बारे-इघोतेगुऑनोर (११.०७) तिसरी आली.

शॉने हिने ४९.४६ सेकंद अशी मोसमातील सर्वोत्तम वेळ नोंदविली. ऑलिंपिक विजेती शॉने लंडन जागतिक स्पर्धेत २० मीटर अंतर बाकी असताना पिछाडीवर पडली होती. या कामगिरीसह तिने मोसमाची सांगता यशस्वी केली. तिला बहारीनच्या १९ वर्षांच्या साल्वा एद नासीरने जोरदार लढत दिली. साल्वा ४९.८८ सेकंद वेळेसह दुसरी आली.

दृष्टिक्षेपात
पुरुष विभाग 

२०० मीटर शर्यतीत अमेरिकेचा २० वर्षांचा नोह लायलेस २० सेकंद वेळेत विजेता. देशबांधव आमीर वेब (२०.०१) दुसरा. या मालिकेत २०० मीटरमधील सर्वाधिक तरुण विजेता.
तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत लंडन जागतिक स्पर्धेच्या निकालांची पुनरावृत्ती. केनियाचा कॉन्सेस्लस किप्रुटो (८ मिनिटे ४.७३ सेकंद) अव्वल. मोरोक्कोचा सौफियानी एल्‌ बक्काली द्वितीय, तर अमेरिकेचा इव्हान जॅगेर तृतीय. पाण्याच्या अखेरच्या अडथळ्यात पडल्यानंतर इव्हानने स्वतःला वेळेत सावरले.
११० मीटर हर्डल्समध्ये सर्जी शुबेन्कोव १३.१४ सेकंद वेळेसह विजयी. रशियाच्या सर्जीचा ‘अधिकृत त्रयस्थ स्पर्धक’ म्हणून सहभाग.
थाळीफेकीत लिथुएनियाचा अँड्रीयस गुड्‌झीयूस ६८.१६ मीटर कामगिरीसह सर्वोत्तम
८०० मीटर शर्यतीत बोट्‌स्वानाचा निजेल ॲमॉस विजयी (१ः४४.५३ सेकंद). यंदाच्या मालिकेत पॅरिस, लंडन, रबाट आणि बर्मिंगहॅम येथेही निजेलचे वर्चस्व.

महिला
पंधराशे मीटरमध्ये ऑलिंपिक आणि विश्‍वविजेत्या केनियाच्या फेथ किपयीगॉनची बाजी. तीन मिनिटे ५७.०४ सेकंद वेळ
उंच उडीत रशियाची मारिया लॅलीत्सकेने २.०२ मीटर कामगिरीसह सर्वोत्तम. यंदा २४ पैकी २४ स्पर्धांत तिची सरशी. ती ‘अधिकृत त्रयस्थ स्पर्धक’ म्हणून सहभागी
पोल व्हॉल्टमध्ये ग्रीसची कॅटरीना स्टेफानिडी (४.८५ मीटर) सर्वोत्तम

Web Title: sports news Elaine Thompson