गॅबा मैदानावर आजपासून पहिली लढत

गॅबा मैदानावर आजपासून पहिली लढत

ब्रिस्बेन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मालिकेला अर्थात ॲशेसला येथील ‘गॅबा’ मैदानावर गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. काही दिग्गज अलीकडेच निवृत्त झाल्यानंतर दोन्ही संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहेत. कागदावर तुल्यबळ वाटणाऱ्या संघांमध्ये मैदानावर तोडीस तोड मुकाबला अपेक्षित आहे.

कसोटीच्या पूर्वसंध्येस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शब्दयुद्ध सुरू ठेवले आहे. २०१३-१४च्या मालिकेत धुमाकूळ घातलेल्या मिचेल जॉन्सन याच्याइतकाच भेदक मारा मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स करतील, अशा शब्दांत त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना सावधानतेचा इशारा दिला. त्या मालिकेत जॉन्सनने ३७ विकेट टिपल्या होत्या. कांगारूंनी ५-० असे धवल यश संपादन केले होते.

स्मिथने नेटमध्ये स्टार्क आणि कमिन्स यांच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. तो म्हणाला, ‘‘काही सत्रांत सराव करताना त्यांची गोलंदाजी मला भीतिदायक वाटली. आमच्यासाठी हा उत्कंठावर्धक कालावधी आहे.’’ कर्णधार या नात्याने आघाडीच्या गोलंदाजांना ताजेतवाने ठेवण्याचे आव्हान स्मिथसमोर असेल. स्टार्क, कमिन्स यांच्यासह जॉश हेझलवूड हे गेले काही दिवसांपासून टिच्चून सराव करीत असून, ते खेळण्यास सज्ज असल्याचे स्मिथने नमूद केले.

ऑफस्पिनर नेथन लायन यानेही आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या मोहिमेवर ऑस्ट्रेलियन्स निघाले आहेत, असे वक्तव्य त्याने केले आहे. वेगवान गोलंदाजांना ‘ब्रेक’ मिळण्यात त्याचा मारा उपयुक्त ठरेल. याशिवाय इंग्लंड संघात बरेच डावखुरे फलंदाज असल्यामुळे तो संघासाठी महत्त्वाचा असल्याचे स्मिथने सांगितले.

वॉर्नरसाठी मॅक्‍सवेल पर्याय
ऑस्ट्रेलियाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शॉन मार्श यांना पर्याय म्हणून अष्टपैलू ग्लेन मॅक्‍सवेल याला पाचारण केले आहे. वॉर्नरची मान दुखावली आहे, पण तो खेळण्याची दाट शक्‍यता आहे. शॉनची पाठ अवघडली आहे. ३१ वर्षांच्या वॉर्नरने ॲशेसमध्ये ४४.९५ धावांची सरासरी राखली आहे. त्याने मंगळवारी-बुधवारी मर्यादित सराव केला, पण बुधवारी तो हेल्मेट न घालता खेळला.

तो अत्यंत प्रतिभासंपन्न असून काहीही घडत असले तरी मार्ग काढू शकतो, असे स्मिथने सांगितले. वॉर्नर खेळल्यास नवोदित कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याच्या साथीत सलामीला येईल.

इंग्लंडकडून बॉलला पसंती
दरम्यान, इंग्लंडने क्रेग ओव्हर्टन याच्याऐवजी जेक बॉलला पसंती दिली. बॉल २६ वर्षांचा आहे. तीन कसोटींत ११४च्या सरासरीने त्याने दोन विकेट घेतल्या आहेत. अध्यक्षीय संघाविरुद्ध ॲडलेडला गोलंदाजी करताना चेंडू टाकल्यानंतर तो पडला. घोटा दुखावल्यामुळे तो शेवटचा सराव सामना खेळू शकला नव्हता. आता तो तंदुरुस्त झाला आहे. त्याने दौऱ्यावर केवळ १५.४ षटके टाकली आहेत. दुसरीकडे ओव्हर्टनने तिन्ही सराव सामने खेळताना आठ विकेट घेतल्या आहेत. याविषयी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट म्हणाला, ‘‘हा निर्णय घेणे सोपे नव्हते. ओव्हर्टनने त्याला सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली आहे, तर बॉलने संधी मिळाल्यावर चांगली गोलंदाजी केली आहे. तो अशा खेळपट्ट्यांवर ज्या पद्धतीने मारा करतो ते पाहता ऑस्ट्रेलियन्ससाठी आव्हान ठरेल.’’

प्रतिस्पर्धी संघ यातून निवडणार 

ऑस्ट्रेलिया
स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट, जॅक्‍सन बर्ड, पॅट कमिन्स, पीटर हॅंड्‌सकाँब, जॉश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नेथन लायन, शॉन मार्श, टीम पेन (यष्टिरक्षक), चॅड सेयर्स, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्‍सवेल

इंग्लंड
ॲलिस्टर कूक, मार्क स्टोनमन, जेम्स व्हिन्स, ज्यो रूट, डेव्हिड मॅलन, जॉनी बेअरस्टॉ (यष्टिरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्‍स, स्टुअर्ट ब्रॉड, जेक बॉल, जेम्स अँडरसन.

२०१३-१४च्या मालिकेत मिचेल जॉन्सन जसा वेग राखत होता, त्यापेक्षा जास्त नाही तरी किमान तेवढीच भेदकता मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोघांमध्ये आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना बॅट इतकी घट्ट पकडावी लागेल, की त्यांच्या हातांची बोटे पांढरीफटक पडतील.
- स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियन कर्णधार

ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही जिंकण्याची वेळ आता आलीच आहे. ऑस्ट्रेलियाचे ब्रिस्बेनमधील रेकॉर्ड फार चांगले आहे. त्यामुळेच ते येथे पहिली कसोटी खेळतात; पण येथेच आम्ही जिंकू शकलो, तर त्यांची सगळीच समीकरणे बिघडून जातील.
- ज्यो रूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com