अमेरिकेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत 

पीटीआय
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

मडगाव- आपला संघ कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आहे, असे इंग्लंडचे प्रशिक्षक स्टीव कुपर यांनी १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीच्या पूर्वसंध्येला आत्मविश्‍वासाने सांगितले होते. त्यांच्या संघातील खेळाडूंनी शनिवारी रात्री अप्रतिम खेळ करताना अमेरिकेचे आव्हान ४-१ अशा फरकाने फोल ठरवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रिआन ब्रेवस्टर याने हॅटट्रिक नोंदविली. 

मडगाव- आपला संघ कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आहे, असे इंग्लंडचे प्रशिक्षक स्टीव कुपर यांनी १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीच्या पूर्वसंध्येला आत्मविश्‍वासाने सांगितले होते. त्यांच्या संघातील खेळाडूंनी शनिवारी रात्री अप्रतिम खेळ करताना अमेरिकेचे आव्हान ४-१ अशा फरकाने फोल ठरवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रिआन ब्रेवस्टर याने हॅटट्रिक नोंदविली. 

त्यांनी पूर्वार्धात दोन गोलांची आघाडी घेतली होती. रिआन ब्रेवस्टर याने तीन मिनिटांच्या फरकाने दोन गोल नोंदवून इंग्लंडची बाजू भक्कम केली. त्याने अनुक्रमे ११ व १४व्या मिनिटाला चेंडूला अचूक दिशा दाखविली. मॉर्गन गिब्ज-व्हाईट याने ६४व्या मिनिटास अमेरिकेचे गोलरक्षक जस्टिन गॅर्सिस याचा बचाव भेदक इंग्लंडला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ७२व्या मिनिटास कर्णधार जोश सार्जंट याने अमेरिकेची पिछाडी एका गोलने कमी केली. या वर्षी २० वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील स्पर्धेत मिळून त्याने नोंदविलेला हा सातवा गोल ठरला. सामन्याच्या भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास अमेरिकेचा बदली खेळाडू सर्जिनो डेस्ट याला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. ब्रेवस्टरला गोलरिंगणात जाणूनबुजून अडथळा आणणे डेस्ट याला खूपच महागात पडले. या वेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्‍यावर ब्रेवस्टरने सामन्यातील वैयक्तिक तिसरा गोल केला. लिव्हरपूल एफसीच्या या ‘स्ट्रायकर’चा हा यंदाच्या स्पर्धेतील चौथा गोल ठरला. इंग्लंड व अमेरिका यांच्यात १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रथमच गाठ पडली होती, त्यामुळे या लढतीबद्दल उत्सुकता होती. पहिल्या पंधरा मिनिटांच्या खेळात दोन गोल स्वीकारल्यानंतर अमेरिकेला नंतर सावरता आले नाही. जपानविरुद्ध पेनल्टी शूटआउटवर विजय मिळविलेला इंग्लिश संघाने आज उल्लेखनीय खेळ केला. ‘९’ क्रमांकाच्या जर्सीतील ब्रेवस्टर आज भन्नाट फॉर्ममध्ये होता. 

माली उपांत्य फेरीत 
गुवाहाटी ः मालीने घानाचा २-१ असा निसटता पराभव करून १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आता त्यांचा इराण किंवा स्पेन यांच्याशी बुधवारी नवी मुंबईत मुकाबला होईल. दोन्ही संघांना भर पावसात खेळले. 

निकाल
अमेरिका - १ (जॉश सार्जंट ७२) पराभूत वि. इंग्लंड - ४ (रिआन ब्रेवस्टर ११, १४, ९०-६ पेनल्टी, गिब्ज व्हाईट ६४)

निकाल
माली - २ (द्रामे १५, डीजेमौसा ६१) विवि घाना - १ (महंमद ७०-पेनल्टी)

आजचे सामने
उपांत्यपूर्व फेरी
स्पेन वि. इराण (सायं. ५)
जर्मनी वि. ब्राझील (रात्री ८)

Web Title: sports news football