साईनाचा सुखावणारा विजय

साईनाचा सुखावणारा विजय

साईप्रणीतने पिछाडीनंतर उलटवली बाजी

मुंबई - भारतीय बॅडमिंटनची पहिली फुलराणी साईना नेहवालने जागतिक स्पर्धेतील आपली विजयाची मोहीम सहज सुरू केली. तिने उंच उडी मारून मारलेले स्मॅश, तसेच ड्रॉप्स तिची तंदुरुस्ती दाखवणारे होते. दरम्यान, बी. साईप्रणीतने त्याची जिगर पणास लावत दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

ग्लासगो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साईनाने सबरिना जॅक्वेट हिला २१-११, २१-१२ असे सरळ गेममध्ये हरवले. बाराव्या मानांकित साईनाचा कोर्टवरील सहज वावर, फटक्‍यांतील सहजता, तसेच हुकूमत तिने या स्पर्धेसाठी केलेली पूर्वतयारी दाखवून देत होती. अर्ध्या तासाच्या लढतीतील साईनाची एकतर्फी हुकूमत मोलाची होती. नेमके हेच पुनरागमनानंतर कुठेतरी लुप्त झाले होते. या विजयासाठी तिला क्वचितच घाम गाळावा लागला. तिचा जम्प स्मॅश, तिच्या प्रतिस्पर्ध्यांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारा होता. याचा तिला न झालेला त्रास सर्वांना इशारा देणाराच होता. 

प्रणीतने या वर्षातील २६ लढतींपैकी २१ वा विजय मिळविला खरा; पण त्याला अँथनी गिनतिंग याच्या कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. प्रणीतने ही लढत १४-२१, २१-१८, २१-१९ अशी जिंकली. त्याने निर्णायक गेममध्ये १२-१८ अशा पिछाडीनंतर सलग आठ गुण जिंकत लढतीचे चित्रच बदलले. या वेळी त्याने दीर्घ रॅलीजवर भर देत प्रतिस्पर्ध्यास चुका करण्यास भाग पाडले. 

सफाईदार श्रीकांत
विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या किदांबी श्रीकांतने ल्युकास कॉर्वी याला २१-९, २१-१७ असे सहज हरवले. श्रीकांतने ही लढत ३२ मिनिटांतच संपवत आगामी लढतींसाठी ताकद राखून ठेवली. श्रीकांतने सुरवातीपासून आक्रमण केले. त्याने खोलवर ड्रॉप्स करीत प्रतिस्पर्ध्यास बेसलाइनवर जाण्यास भाग पाडले. त्याच्या फोरहॅंड्‌स ड्राईव्ह आणि ताकदवान स्मॅशनी लढतीचा निर्णयच स्पष्ट केला. श्रीकांतचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हा सलग बारावा विजय आहे.
दरम्यान, तन्वी लाड एकेरीत पराजित झालेली भारताची पहिली खेळाडू ठरली. तिला सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध  ९-२१, १९-२१ अशी हार पत्करावी लागली. तन्वीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार प्रतिकार केला, पण भक्कम बचावाच्या जोरावर जिंकलेल्या सुंगची आता लढत साईनाविरुद्ध होईल.

येथील कोर्ट तुलनेत स्लो आहेत; पण वातावरण चांगले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतल्यास प्रणीतने पिछाडीवरून जिंकलेला गेम मोलाचा ठरतो.
- पुल्लेला गोपीचंद, भारतीय मार्गदर्शक

निर्णायक गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर दीर्घ रॅलीजवर भर देण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात  आले. ही व्यूहरचना यशस्वीपणे अमलात आणली आणि प्रतिस्पर्ध्याला चुका करण्यास भाग पाडले, याचे समाधान आहे. 
- बी. साई प्रणीत

कोणत्याही स्पर्धेतील सलामीची लढत सोपी नसते. त्यातच प्रतिस्पर्धी तुमचा खेळ जाणणारी असेल, तर आव्हान अवघड असते. हा विजय नक्कीच सुखाविणारा आहे. आता कोर्ट, तसेच येथील परिस्थिती जाणली आहे. आगामी लढतींसाठी नक्कीच आता जास्त तयारी झाली आहे.
- साईना नेहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com