शरदला रौप्य; तर वरुणला ब्राँझपदक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली. 

नवी दिल्ली - जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने रविवारी उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली. 

शरदने कारकिर्दीमधील सर्वोच्च कामगिरी करताना १.८४ मीटर उडी मारली. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमेरिकेच्या सॅम ग्वेवेपेक्षा त्याची उडी फक्त दशांश दान मीटरने कमी पडली. वरुणनेदेखील १.७७ मीटर उडी मारताना ब्राँझपदकाची कमाई केली. रौप्य कामगिरीनंतर शरद म्हणाला, ‘‘मी येथे सुवर्णपदक मिळविण्यासाठीच आलो होतो. माझे प्रयत्न थोडे कमी पडले. रौप्यपदक मिळविल्याचाही आनंद आहेच.’’ वरुणनेदेखील पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र, आपण सर्वोत्तम कामगिरी दाखवू शकलो नाही, याची खंत त्याने व्यक्त केली. 

स्पर्धेच्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने वातावरण थंड झाले होते. उडी मारण्यासाठी हे वातावरण चांगले होते, अशी प्रतिक्रिया शरदने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘हवामानात चांगलाच थंडपणा आला होता. उडी मारण्यासाठी अत्यंत अनुकूल असेच हे वातावरण होते. पण मी एका पायाने उडी मारणारा खेळाडू असल्यामुळे मला तोटा झाला. पावसामुळे मी ज्या पायाने उडी मारतो, तेथील ट्रॅक घसरडा झाला होता. त्याचा निश्‍चित कामगिरीवर परिणाम झाला.’’
भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदके मिळविली आहेत. सरदारसिंग गुर्जर याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर दोन दिवसांनी अमित सरोहाने क्‍लब एफ-५१ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कमलज्योती दलाल हिने ब्राँझपदकाची कमाई केली.

Web Title: sports news global handicaped competition

टॅग्स