जागतिक पुरुष बॉक्‍सिंग स्पर्धा भारतात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

आंतरराष्ट्रीय महासंघाचा निर्णय, पुढील वर्षी होणार महिलांची स्पर्धा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या तसेच २०२१ मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला. मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

गेली काही वर्षे भारतीय बॉक्‍सिंग संघटनेच्या शोधात होते. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या कामगिरीवर ही त्याचा परिणाम झाला होता.

आंतरराष्ट्रीय महासंघाचा निर्णय, पुढील वर्षी होणार महिलांची स्पर्धा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग महासंघाने पुढील वर्षी होणाऱ्या महिलांच्या तसेच २०२१ मधील पुरुषांच्या जागतिक बॉक्‍सिंग अजिंक्‍यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला. मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

गेली काही वर्षे भारतीय बॉक्‍सिंग संघटनेच्या शोधात होते. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या कामगिरीवर ही त्याचा परिणाम झाला होता.

आंतरराष्ट्रीय महासंघाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशात बॉक्‍सिंगसह संघटना अस्तित्वात आल्यावर एक वर्षाच्या आतच जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली. या निर्णयाने भारतामधील बॉक्‍सिंग प्रसाराला चालना मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जाऊ लागला आहे. 

आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग महासंघाचे अध्यक्ष डॉ. चिंग कुओ वू यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर २०१९ मधील जागतिक स्पर्धेचे यजमानपद सोचीला देण्यात आल्याचीही घोषणा त्यांनी केली. त्याचवर्षी महिलांची जागतिक स्पर्धा तुर्की येथे होईल. भारताने आतापर्यंत कधीच पुरुषांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन केले नव्हते. मात्र, २००६ मध्ये महिलांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते. भारतात यापूर्वी १९९० मधील विश्‍वकरंडक आणि २०१० राष्ट्रकुल अजिंक्‍यपद या दोनच पुरुषांच्या महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन भारताने केले आहे. भारतीय बॉक्‍सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘प्रथमच भारतात लागोपाठ दोन जागतिक स्पर्धांचे आयोजन होत आहे. पुरुषांच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन मिळविण्यासाठी आम्ही सादर केलेले सादरीकरण आंतरराष्ट्रीय महासंघाला आवडल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला.’’

भारतातील बॉक्‍सिंग क्षेत्रातूनही या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पुरुष संघाचे प्रशिक्षक सॅंटिआगो निएवा म्हणाले, ‘‘दोन जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्याची भारताला मिळालेली संधी ही नक्कीच भारतामधील उत्साह वाढवणारी आहे. पुढील काही वर्षांसाठी हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंना आता कठोर मेहनत घ्यावी लागेल.’’ महिला संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू म्हणाले, ‘भारतीय महासंघाने खूप मोठी संधी खेळाडूंना उपलब्ध करून दिली आहे. आता अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ खेळाडूंची आहे.’’

पुरुषांमध्ये आतापर्यंत फक्त ब्राँझच
जागतिक स्पर्धेचा विचार करायचा झाला, तर महिलांमध्ये मेरी कोम हिने पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवून आपला ठसा उमटवला आहे. पुरुषांना मात्र आतापर्यंत फक्त तीनच पदके मिळाली असून, तीनही ब्राँझपदके आहेत. यामध्ये विजेंदर सिंग (२००९), विकास क्रिशन (२०११) आणि शिवा थापा (२०१५) यांचा समावेश होतो.

भारतीय महासंघाने खूप मोठी जबाबदारी घेतली आहे. आता बॉक्‍सिंग खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष राहील. महासंघाने भारतीय खेळाडूंसाठी आता शास्त्रोक्तपद्धतीच्या प्रशिक्षणाचे आणि सर्व अत्याधुनिक सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे.
- अखिल कुमार

Web Title: sports news global man boxing competition in india