मुंबईच्या हीनाचा जितूसह सुवर्णवेध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई - हीना सिद्धू आणि जितू रायने गॅबाला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या एअर पिस्तूल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धा प्रकाराचा टोकियो ऑलिंपिकमध्ये समावेश होणार असला, तरी या  कामगिरीची नोंद अद्याप पदक क्रमवारीत होत नाही.

मुंबई - हीना सिद्धू आणि जितू रायने गॅबाला विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या एअर पिस्तूल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धा प्रकाराचा टोकियो ऑलिंपिकमध्ये समावेश होणार असला, तरी या  कामगिरीची नोंद अद्याप पदक क्रमवारीत होत नाही.

सुवर्णपदकाच्या लढतीत रशियाने ४-० अशी आघाडी घेत भारतास धक्का दिला; पण रोनक पंडितचे मार्गदर्शन लाभलेल्या भारतीय जोडीने या पिछाडीनंतर रशियाला ७-६ असे चकवले. ‘‘माझी आणि जितूची अंतिम फेरीत कामगिरी कायम उंचावते. या वेळीही आम्ही हेच दाखवून दिले. अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यांनी खूपच चांगले स्कोअर केले. सुरवातीच्या पिछाडीमुळे दडपण आले होते; पण त्यानंतरही आम्ही यशस्वी ठरलो, याचा आनंद आहे’, असे हीनाने सांगितले.

वैयक्तिक दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू; तसेच हीनाची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली होती. जितू बारावा आला होता; तर हीना नववी. मात्र या अपयशाची भरपाई दोघांनी मिश्र स्पर्धेत केली. या प्रकारातील त्यांचे हे दुसरे विश्‍वकरंडक सुवर्णपदक आहे. दिल्ली स्पर्धेतही त्यांनी हे सुवर्णपदक जिंकले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्यांनी अंतिम फेरीत रशियाच्या जोडीला ७-६ असे पराजित केले.

भारतीय जोडीने प्राथमिक फेरीपासून हुकमत राखली. त्यांनी ४८५ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला होता. यात हीनाचा वाटा २४२ गुणांचा होता; तर जितूचा २४३ गुणांचा. या चुरशीच्या स्पर्धेत सर्बिया, युक्रेन आणि चीन ४८२ गुणांसह संयुक्त दुसरे आले होते. प्राथमिक फेरीत आठवे आलेल्या रशियाने अंतिम फेरीत भारतासमोर खडतर आव्हान उभे केले. अंतिम फेरीच्या टप्प्यात अव्वल क्रमांक मिळवताना भारताने (२४०.७) रशियाला (२३९.८) मागे टाकले. 

Web Title: sports news Heena Sidhu Jitu Rai