राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे ३२५ सदस्यांचे पथक

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली - पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक नेमके किती सदस्यांचे असणार याचे उत्तर अखेर सोमवारी मिळाले. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंच्या पालकांसह क्रीडा मंत्रालयाने भारताच्या ३२५ सदस्यांच्या पथकाला मंजुरी दिली. 

नवी दिल्ली - पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक नेमके किती सदस्यांचे असणार याचे उत्तर अखेर सोमवारी मिळाले. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंच्या पालकांसह क्रीडा मंत्रालयाने भारताच्या ३२५ सदस्यांच्या पथकाला मंजुरी दिली. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने सादर केलेल्या यादीतील सदस्यांना क्रीडा मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांनी वगळल्यानंतर ‘आयओए’ अध्यक्षांनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या हस्तक्षेपानंतर क्रीडा मंत्रालयाने यादीला आज अंतिम स्वरूप दिले. यात साईनाचे वडील हरवीरसिंग आणि सिंधूची आई विजया यांना सरकारच्या खर्चाशिवाय जाण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर पालक याच कारणाने वगळण्यात आलेले नेमबाज हीना सिद्धूचे पती रोनक पंडित यांना प्रशिक्षक म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली. 

क्रीडा मंत्रालयाने आज ३२५ सदस्यांचे पथक मंजूर केले. यातील २२ अतिरिक्त पदाधिकारी सरकारच्या खर्चाशिवाय जाणार आहेत.  

वैद्यकीय पथक दोघांचेच
सरकारने भारतीय पथकाबरोबर असणाऱ्या वैद्यकीय पथकातील सदस्यांची संख्या चारवरून दोन केली आहे. यातून वैद्यकीय तज्ज्ञ मेंडिरत्ता आणि महिला फिजिओ हेमा वालेचा यांना वगळण्यात आले आहे. सचिन जैन हे डॉक्‍टर आणि अमित सोनी हे पुरुष फिजिओ असे दोघेच आता पथकातील अधिकृत वैद्यकिय अधिकारी असतील. 

क्रीडा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की या पथकाचा खर्च ‘साई’ला (भारतीय क्रीडा प्राधिकरण) मिळणाऱ्या निधीतून केला जाईल. राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी मदतीच्या योजनेअंतर्गत हा निधी पुरविला जातो. या प्रक्रियेसाठी ‘साई’ एका समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. युवा आणि क्रीडा मंत्रालय, ‘नाडा’ (राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था) भारतीय ऑलिंपिक संघटना आदींच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. ‘आयओए’, ‘साई’, ‘नाडा’ तसेच संबंधित क्रीडा महासंघांनी डोप टेस्ट घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. ‘आयओए’ खेळाडू रवाना होण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तंदुरुस्ती तपासू शकते.’

हे प्रश्‍न अनुत्तरीत
सरकारने भारतीय पथकाला मंजुरी दिली असली, तरी ॲथलेटिक्‍स क्रीडा प्रकारातील सिद्धार्थ यादव आणि ४०० मीटरमधील धावपटू विजयकुमारी यांच्या सहभागाबद्दल अजूनही संदिग्धता आहे. सरकारने यांच्या नावाला मंजूरी दिली असली, तरी या दोघांची प्रवेशिका भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाकडून उशिरा आल्याने संयोजन समितीने त्यांना प्रवेश नाकारला आहे. ॲथलेटिक्‍स महासंघाला या दोन्ही खेळाडूंना प्रवेश मिळेल याचा विश्‍वास आहे. त्यादृष्टिने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

Web Title: sports news India 325 member squad for Commonwealth Games