भारताचा आणखी एक मोठा विजय

पीटीआय
बुधवार, 17 जानेवारी 2018

ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर आम्ही रिलॅक्‍स झालेलो नाही. प्रत्येक जण आपला सर्वोत्तम खेळ करत आहे. आम्ही निकालापेक्षा खेळ कसा करायचा यावर चर्चा करत असतो. आमचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ अतिशय अनुभवी आहे. ते सदैव आम्हाला जमिनीवर ठेवत असतात. राहुलसरांबरोबर राहणे हा आमचा सन्मान आहे.
-  पृथ्वी शॉ, भारतीय कर्णधार

माउंट मौंगंनुई (न्यूझीलंड) - बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा सलामीलाच धुव्वा उडवल्यामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या भारतीय युवकांनी पापूआ न्यू गिनी संघाचा १० विकेटने पराभव केला आणि १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. डावखुरा फिरकी गोलंदाज अनुकूल रॉयच्या पाच विकेट आणि कर्णधार पृथ्वी शॉचे झंझावाती नाबाद अर्धशतक भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

ऑस्ट्रेलियावर शंभर धावांनी विजय मिळवणाऱ्या भारताचा पापूआ न्यू गिनी संघावर विजय अपेक्षित होता; मात्र त्यासाठी किती वेळ मैदानात राहावे लागणार याचीच उत्सुकता होती. प्रतिस्पर्ध्यांना २१.५ षटकांत ६४ धावांत गुंडाळल्यानंतर विजयाचे आव्हान अवघ्या ९ षटकांत पार केले.

भारताने नाणेफेक जिंकून पापूआ न्यू गिनी संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले आणि तिसऱ्या षटकापासून त्यांची वाताहत सुरू झाली. वेगवान गोलंदाज शिवम मालीने दोन विकेट मिळवल्यानंतर अनुकूल रॉयच्या फिरकीसमोर पापूआ न्यू गिनीच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

सरासरी उंचावण्यासाठी भारतीयांनी ६५ धावांचे आव्हान लवकरात लवकर पार करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला करणाऱ्या पृथ्वी शॉने पापूआ न्यू गिनीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अवघ्या ३९ चेंडूत त्याने नाबाद ५७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ः पापूआ न्यू गिनी ः २१.५ षटकांत सर्व बाद ६४ (सायमन अताई १३, ओविया सॅम १५, शिवम मावी ५-०-१६-२, अनुकूल रॉय ६.५-२-१४-५) पराभूत वि. भारत ः ८ षटकांत बिनबाद ६७ (पृथ्वी शॉ नाबाद ५७-३९ चेंडूत १२ चौकार).

Web Title: sports news india cricket