भारतीय संघास सदोष खेळाचा फटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई / तौरंगा, ता. १८ - सातत्याचा अभाव हे भारतीय हॉकीचे दुखणे अद्याप बरे होण्यास तयार नाही. गोल करण्याच्या किमान आठ संधी दवडत भारताने न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध ०-२ असा पराभव ओढवून घेतला. 

मुंबई / तौरंगा, ता. १८ - सातत्याचा अभाव हे भारतीय हॉकीचे दुखणे अद्याप बरे होण्यास तयार नाही. गोल करण्याच्या किमान आठ संधी दवडत भारताने न्यूझीलंडमधील चौरंगी हॉकी स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध ०-२ असा पराभव ओढवून घेतला. 

जागतिक हॉकीत वेगाने प्रगती करीत असलेल्या बेल्जियमविरुद्ध चार पेनल्टी कॉर्नर, तसेच मैदानी गोलाच्या चार संधी दवडल्यावर भारताने लढत जिंकली असती तरच आश्‍चर्य होते. चेंडूवर नियंत्रण राखण्यात वाक्‌बगार असलेल्या बेल्जियमने वेगवान चाली करीत भारतासमोरील आव्हान खडतर केले. भारतास बेल्जियमविरुद्धच्या १७ पैकी १३ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. भारतीय पुन्हा एकवार बेल्जियमविरुद्ध खेळाची दिशा ठरवणाऱ्या मध्यक्षेत्रात हुकमत राखू शकला नाही. त्याचबरोबर भारताचा बचावही विस्कळित होता. आर्थर डे स्लूवर्स (८) व व्हिक्‍टर वेगनेझ (३४) यांचे गोल सोडल्यास भारतास अधिक गोल स्वीकारावे लागले नाहीत, हेच त्यातल्या त्यात सुदैव.

रिओ ऑलिंपिकमध्ये बेल्जियमने भारतास उपांत्यपूर्व फेरीत पराजित करताना जसा खेळ केला होता, तसाच खेळ केला. पहिल्या सत्रात जोरदार आक्रमणे केली. दोन्ही बगलांतून आक्रमणास सुरवात करीत भारतीयांवर दडपण आणले. भारताची आक्रमणे मध्यरेषेच्या आसपास रोखली. गोलक्षेत्रात प्रवेश करताना बेल्जियम काही वेळा धोकादायक वाटत नसे; पण काही क्षणांत ते आक्रमक गर्दी करीत गोलची संधी निर्माण करीत होते. श्रीजेशचे चांगले गोलरक्षण आणि बेल्जियमची काहीशी सदोष नेमबाजी यामुळेच बेल्जियम जास्त गोल करू शकला नाही. 

भारतीय आक्रमकांच्या चुका अक्षम्य होत्या. गोलची संधी निर्माण केल्यावर चुकीच्या खेळाडूकडे पास दिला जात होता. मध्यरक्षक चेंडू पास करण्याची औपचारिकताच पार पाडत आहेत, असे वाटत होते. बचावात सातत्य नव्हते. गोलक्षेत्रात छोटे पास देत भारतीयांचा गोंधळ उडवण्यात ते अनेकदा यशस्वी ठरले. हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील भारताविरुद्धच्या पराभवाचा वचपा त्यांनी काढला.

Web Title: sports news india hockey