भारताची पी. व्ही. सिंधू  जागतिक यशापासून दूरच

भारताची पी. व्ही. सिंधू  जागतिक यशापासून दूरच

दुबई - पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिज फायनल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानी आव्हान पार करता आले नाही. जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीपाठोपाठ सिंधू सुपर सीरिज स्पर्धेच्या निर्णायक लढतीत जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध दीड तास चाललेल्या लढतीत सिंधूला २१-१५, १२-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

सिंधूने याच स्पर्धेच्या साखळी लढतीत यामागुचीविरुद्ध ३६ मिनिटांत बाजी मारली होती, पण या वेळी पहिला गेम जिंकल्यावर, तसेच दुसऱ्या गेममध्ये सुरवातीस ५-० आघाडी असतानाही सिंधूला विजय मिळविता आला नाही. पहिल्या गेममध्ये सिंधूने फटक्‍यांची छान पेरणी करीत ५-८ पिछाडीनंतर सलग आठ गुण जिंकले आणि गेमही जिंकला, त्या वेळी सिंधू ही लढत झटपट जिंकणार, असे वाटत होते.  दुसऱ्या गेममध्ये सिंधूने पहिले पाच गुण जिंकताना खेळाच्या गतीत हुशारीने बदल कसा करावा हेच दाखवले, मात्र याच वेळी यामागुचीने आक्रमण हाच बचाव, हा पवित्रा घेतला. तिच्या अचानक बदलत्या पवित्र्याने सिंधू काहीशी गांगरली. तिच्याकडून चुका होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या गेमच्या उत्तरार्धात सिंधूचा खेळ पाहून तिने पहिला गेम हुकूमत दाखवत जिंकला आहे, असे वाटतही नव्हते. तिला कोर्टवर सर्वत्र पळावे लागत होते, तरीही गुण मिळत नव्हते. 

तिसऱ्या गेममध्ये सिंधूने ४-० आघाडी गमावली, पण पुन्हा ११-८ वर्चस्व घेतले. या गेमचा उत्तरार्ध पाहून सिंधू-ओकुहारा यांच्यातील जागतिक लढतीच्या अंतिम फेरीची आठवण होत होती. दीर्घ रॅलीज सुरू झाल्या. सिंधू विजयी वाटत असणारे स्मॅश परतवत होती. पारडे सतत बदलत होते. १९-१९ बरोबरीच्या वेळी सिंधूची रॅली सलग  दोनदा नेटमध्ये फसली आणि यश दुरावले. 

सिंधू सरत्या वर्षात
    सहापैकी तीन फायनलमध्ये हार. (जागतिक स्पर्धा, हाँगकाँग ओपन, दुबई सुपर सीरिज फायनल स्पर्धेत पराभव, सय्यद मोदी, इंडिया ओपन, कोरिया ओपन स्पर्धेत विजेतेपद)
    ऑलिंपिक तसेच जागतिक उपविजेती सिंधू सुपर सीरिजच्या पहिल्याच अंतिम लढतीत पराजित.
    या स्पर्धेच्या अंतिम लढतीत हरणारी सिंधू दुसरी भारतीय. यापूर्वी २०११मध्ये साईना नेहवाल. 
    सिंधूने यामागुची विरुद्ध यापूर्वी सहापैकी चार लढती जिंकल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com