पुण्याच्या अंजली भालिंगे पन्नाशीत ‘आयर्न मॅन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

भारतातील महिलांनी ठरवले, तर त्यादेखील ही शर्यत पूर्ण करू शकतात, असा मला विश्‍वास आहे. कठिण आहे पण, अशक्‍य नाही. देशातील आणखी महिलांना अशा स्पर्धातून सहभागी झालेले पाहायला मला आवडेल.
- अंजली भालिंगे

पुणे - ‘आयर्न मॅन’ या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या ट्रायथलॉनच्या अनोख्या शर्यतीत देशातील, राज्यातील अनेक तरुणांनी आपले नाव झळकावले आहे. पण, या शर्यतीत पुण्याच्या अंजली भालिंगे या महिलेने वयाच्या पन्नाशीला ‘आयर्न मॅन’ होण्याचा मान मिळविला. अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला खेळाडू आहेत. 

जलतरण (३.८ किमी), सायकलिंग (१८० किमी) आणि धावणे (४२.२ किमी) अशा शर्यती न थांबता ठराविक वेळेत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळतो. अंजली भालिंगे यांनी २७ ऑगस्ट रोजी फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत हे खडतर आव्हान १४ तास ५२ मिनिटे आणि २६ सेकंदात पूर्ण केले. त्यांनी जलतरणाचे अंतर २.०६ तासांत कापले, नंतर सायकलिंगमध्ये त्यांनी ७ तास १३ मिनिटे अशी वेळ दिली. अखेरीस ४२.२ किलोमीटरचे अंतर त्यांनी ५ तास ०९ मिनिटांत पूर्ण केले. त्यांनी वेळेत शर्यत पूर्ण करताना १८वा क्रमांक मिळविला.

साहसाची आवड असणाऱ्या अंजली यांनी अशा अनेक आव्हानात्मक स्पर्धांमध्ये पदके मिळविली आहेत. पण, ‘आयर्न मॅन’ शर्यत पूर्ण करणे त्यांच्यासाठी खास होते. त्या म्हणाल्या, ‘‘अचूक अभ्यास, खडतर मेहनत आणि परिपूर्ण प्रशिक्षण घेतल्यामुळेच हे साध्य होऊ शकले. ‘आयर्न मॅन’चा अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. पण, अशा आव्हानात्मक स्पर्धांमध्ये यापूर्वी सहभागी झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी या आव्हानाला तयार होते. पहिलीच स्पर्धा असल्यामुळे मी शर्यत वेळेत पूर्ण करणे इतकेच निश्‍चित केले होते आणि ते साध्य केल्याचा आनंद आहे.’’ यासाठी त्यांना ‘आयर्न मॅन’चा अनुभव असलेल्या पुण्याच्याच कौस्तुभ राडकरची मदत झाली. योगेश आलमले यांनी धावण्याच्या बाबतीत, तर नितीन ढवळे यांनी त्यांना आहाराबाबत मार्गदर्शन केले. त्याचवेळी पती नितीन यांनी दिलेले प्रोत्साहनही महत्त्वाचे होते हे सांगायला त्या विसरत नाहीत. त्या म्हणाल्या, ‘‘पती नितीन यांना माझी ‘आयर्न मॅन’ बनण्याची जिद्द माहीत होती. एखादी गोष्ट ठरविली की ती मी पूर्ण करणारच हे ते जाणून होते. त्यामुळे त्यांनी यासाठी आवश्‍यक त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी जुळवून आणल्या.’’

Web Title: sports news iron man anjali bhalinge