सिंधू, साईनाचे आव्हान आटोपले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

टोकियो - भारताच्या ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांचे गुरुवारी जपान ओपन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेतील आव्हान आटोपले. पुरुष एकेरीत मात्र, किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

सिंधूला पुन्हा एकदा जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. साईनाला ऑलिंपिकविजेत्या कॅरोलिना मरिन हिने १६-२१, १३-२१ असे पराभूत केले. 

सिंधू आणि ओकुहारा यांच्या सलग तिसऱ्यांदा लढत होत होती. फरक इतकाच की पहिल्या दोन लढती अंतिम फेरीच्या होत्या आणि आजची लढत दुसऱ्या फेरीची होती. पहिल्या दोन्ही लढतीत शारीरिक क्षमतेची कसोटी लागली होती. सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाचे प्रदर्शन दोघींकडून घडले होते. या वेळी मात्र सिंधूला तिचा खेळ दाखवता आला नाही. वेग आणि फटक्‍यांवर नियंत्रण राखण्यात तिला अपयश आले. तिच्या झालेल्या या चुकांचा फायदा ओकुहाराने सहज उचलला आणि ४७ मिनिटांत विजय मिळविला. सिंधूने पहिल्या गेममध्ये ११-९ नंतर १८-१६ अशी आघाडी गमावली. दुसऱ्या फेरीत मात्र तिला संधीच मिळाली नाही. 

साईनाने देखील जणू सिंधूच्याच चुका पुढे चालू ठेवल्यासारखा खेळ केला. पहिल्या गेमला मिळविलेली १४-१० अशी आघाडी तिला राखता आली नाही. दुसऱ्या गेमलाही तिने सुरवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मरिनच्या ताकदवान स्मॅशेसपुढे साईनाचे नियोजन फिके पडले. 

श्रीकांत, प्रणॉय सरस
तंदुरुस्तीच्या आघाडीवर सरस ठरणाऱ्या प्रणॉय आणि श्रीकांत यांनी आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली. श्रीकांतने हाँग काँगच्या हू यून याचे आव्हान २१-१२, २१-११ असे संपुष्टात आणले. त्याची गाठ आला जगज्जेत्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेनशी पडणार आहे. प्रणॉयने सु जेन हाओ याचा २१-१६, २३-२१ असा पराभव केला. त्याची गाठ आतचा द्वितीय मानांकित शी युकी याच्याशी पडणार आहे. त्याने भारताच्याच समीर वर्मा याचे आव्हान १०-२१, २१-१७, २१-१५ असे मोडून काढले. 

मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्‍विनी पोनप्पा यांनी इंडोनेशियाच्या प्रविण जॉर्डन आणि डेबी सुसांतो यांना कडवा प्रतिकार केला. मात्र, त्यांना विजय मिळविण्यात यश आले नाही. भारतीय जोडीला २७-२९, २१-१६, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: sports news japan open badminton series competition