कामगिरी होत नाहीये, मला वगळा - झूलन

पीटीआय
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

कोलकता - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या यशात मध्यमगती गोलंदाज झूलन गोस्वामी हिचा मोठा वाटा आहे. पण, एक वेळ तिनेच खराब कामगिरीमुळे आपल्याला संघातून वगळले तरी चालेल, असे स्वतःहून प्रशिक्षकांना सांगितले होते. 

कोलकता - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या यशात मध्यमगती गोलंदाज झूलन गोस्वामी हिचा मोठा वाटा आहे. पण, एक वेळ तिनेच खराब कामगिरीमुळे आपल्याला संघातून वगळले तरी चालेल, असे स्वतःहून प्रशिक्षकांना सांगितले होते. 

झूलनने स्पर्धेत १० गडी बाद केले. अंतिम फेरीत इंग्लंडला रोखताना तिची गोलंदाजी निर्णायक ठरली होती. पण, स्पर्धेच्या सुरवातीला तिला लय गवसली नव्हती. गोलंदाजी चांगली होत नव्हती. अशा वेळी मीच प्रशिक्षकांना मला संघातून वगळा, असे सांगितल्याची आठवण तिने सांगितली. ती म्हणाली, ‘‘माझी तयारी ज्या पद्धतीने झाली होती, त्यावर मी समाधानी होते. पण, मला म्हणावे तसे यश येत नव्हते. निराश झाले होते. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या लढतीनंतरच मी प्रशिक्षकांना मला वगळण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तुझा अनुभव महत्त्वाचा आहे. तू मैदानात असणे संघासाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे तू मला हवीस, असे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी सांगितले. यामुळे माझा आत्मविश्‍वास दुणावला.’’

बंगाल क्रिकेट संघटनेच्या वतीने मंगळवारी तिचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ती बोलत होती. ती म्हणाली, ‘‘उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मेग लॅनिंग हिला बाद केलेला चेंडू या स्पर्धेतील माझा सर्वोत्तम होता. विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरविणे सोपे नव्हते. अशा वेळी त्यांची प्रमुख फलंदाज लॅनिंग हिची विकेट शून्यावर मिळणे म्हणजे विजयाची चाहूल होती.’’

खेळ म्हटले की हार-जीत आलीच. त्याचा फारसा विचार करायचा नसतो. भारतीय महिला अंतिम फेरीत हरल्या असल्या, तरी त्यांनी विजेतेपदापेक्षा खूप काही मिळविले आहे. प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.
ममता बॅनर्जी, बंगालच्या मुख्यमंत्री

Web Title: sports news Jhulan Goswami