हीना-जितूचा मिश्र दुहेरीत ऐतिहासिक सुवर्णवेध

हीना-जितूचा मिश्र दुहेरीत ऐतिहासिक सुवर्णवेध

मुंबई - चार वर्षांपूर्वी ऐनवेळी प्रवेश लाभल्यानंतर हीना सिद्धूने विश्‍वकरंडक नेमबाजीच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने आता हीच कामगिरी जितू रायच्या साथीत दुहेरीत केली आहे. जागतिक नेमबाजी संघटनेने प्रथमच अधिकृतपणे घेतलेल्या या विश्‍वकरंडकाच्या मिश्र दुहेरीत हीना-जितूने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात बाजी मारली. 

जितू-हीनाचे या वर्षातील मिश्र दुहेरीतील हे तिसरे सुवर्णपदक. त्यांनी नव्याने सुरू झालेल्या प्रकारातील पहिले सुवर्णपदक दिल्लीत फेब्रुवारीत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत जिंकले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती जूनमधील अझरबैझान स्पर्धेत केली होती. आता आपली हुकूमत अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत अधोरेखित केली. या प्रकाराचा ऑलिंपिक स्पर्धेत समावेश असल्यामुळे या यशास जास्त महत्त्व आहे.

भारतीय जोडीने प्राथमिक फेरीत हुकूमत राखली होती; पण अंतिम फेरीच्या सुरवातीस जितूला सूर गवसला नाही. हीनाच्या चांगल्या कामगिरीने भारतीय पदकाच्या स्पर्धेत कायम होते. जितूचा जम बसल्यावर भारतीय जोडीची प्रगती होत गेली. भारतीय जोडीने पाहता-पाहता तिसऱ्या क्रमांकावरून अव्वल क्रमांक मिळविला. जितू-हीना अंतिम फेरीत ४८३.४ गुणांसह अव्वल ठरले. त्यांनी फ्लोरियन फॉक्वेट-सेलीन गॉबेरविले या फ्रान्सच्या जोडीला (४८१.१) मागे टाकले.

अंतिम फेरी प्रत्येकी ३० शॉटस्‌ची असते. प्रत्येकी १७ शॉटस्‌नंतर पहिली जोडी बाद होते, त्यानंतर प्रत्येकी चार शॉटस्‌नंतर एकेक जोडी बाद होत जाते. हीनाच्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय जोडी स्पर्धेत आव्हान राखून होती. जितूने १५ व्या आणि १७ व्या शॉटस्‌मध्ये १०.९ गुणांचा वेध घेतला. त्यामुळे भारतीय जोडीचा अव्वल क्रमांक निश्‍चित झाला. 

प्राथमिक फेरीत भारतीय जोडीने ७६७ गुण मिळवत अव्वल क्रमांक मिळविला होता. त्यावेळीही हीनाची कामगिरी जास्त सातत्यपूर्ण होती. प्राथमिक फेरीनंतर भारतासह फ्रान्स, चीन, युक्रेन आणि तैवानच्या जोड्या अंतिम फेरीस पात्र ठरल्या होत्या. 

घरच्या रेंजवर सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद काही औरच असतो. चाहत्यांचे प्रोत्साहन असते; तसेच अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपणही असते. या स्पर्धेचे स्वरूप बदलले गेले. त्यानंतरच्या सरावातील कामगिरीपेक्षा मुख्य स्पर्धेत चांगली कामगिरी झाली हे जास्त सुखावत आहे. गेले काही दिवस एकत्रित सराव केल्याचा आम्हाला फायदा झाला.
- हीना सिद्धू

स्पर्धेचे नवे स्वरूप आमच्या शूटिंगसाठी जास्त पोषक आहे. पूर्वीपेक्षा स्पर्धा जास्त वेळ चालते; पण हे स्वरूप अधिक भावले. आमची चांगली कामगिरी मोलाची आहे. प्राथमिक फेरीतील अव्वल स्थान अंतिम फेरीतही राखू शकलो हे मोलाचे आहे.
- जितू राय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com