मुंबई उपनगरनेच मोडली पुण्याची मक्तेदारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

कराड - राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत महिला विभागात परंपरागत प्रतिस्पर्धी राहिलेल्या पुणे, मुंबई उपनगर संघांच्या अंतिम लढतीत या वेळी मुंबई उपनगरने बाजी मारली. अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव या सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंच्या मुंबई उपनगर संघाने पुण्याचा ३०-२३ असा पराभव करून पुण्याची राज्य महिला कबड्डीतील बारा वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली. पुण्याच्या पुरुष संघाने मात्र विजेतेपद राखले. मात्र, त्यांना कोल्हापूरचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला.

विश्रांतीच्या १२-११ अशा निसटत्या आघाडीनंतर उपनगरने उत्तरार्धात हुकुमत राखली. पुण्यास निष्प्रभ करताना उपनगरने निर्णायक लढतीत ३०-२३ असा विजय मिळवला. अभिलाषा आणि सायलीने गेल्याच महिन्यात भारताच्या आशियाई महिला कबड्डीच्या विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांनी कोमल देवकरच्या साथीत उत्तरार्धात पुण्याला प्रतिकाराचीही फारशी संधी दिली नाही. उपनगरने पुण्यावर तीन लोण देत बाजी मारली. त्यातील उत्तरार्धातील दोन लोणनी लढतीचा निर्णयच केला. संपूर्ण सामन्यात पुण्याकडून केवळ आम्रपाली गलांडे हिच्याच चढाया यशस्वी ठरत होत्या. तिला पूजा शेलारची साथ मिळाली. अखेरच्या टप्प्यात आम्रपालीचीच पकड झाल्याने पुण्याचे आव्हान संपुष्टात आले. स्नेहल शिंदे आणि सायली केरिपाळे यांना आलेले अपयश पुण्याला चांगलेच महागात पडले. 

पुरुषांच्या अंतिम लढतीत पुण्याने नियोजित वेळेतील २४-२४ अशा बरोबरीनंतर कोल्हापूरचे आव्हान पाच-पाच चढायांच्या टायब्रेकरमध्ये ६-५ असे परतवून लावले. सिद्धार्थ जाधव, मोबीन शेख या पुण्याच्या खेळाडूंनी  उल्लेखनीय खेळ केला. मात्र, टायब्रेकमध्ये ५-५ अशा बरोबरीत कोल्हापूरच्या अखेरच्या  चढाईपटूची पकड करणारा  शिवराज जाधव पुण्याचा हिरो ठरला. त्यापूर्वी कोल्हापूरने सांगलीचे आव्हान पाच-पाच चढायांच्याच लढतीत २८-२८ (८-५) असे परतवून लावले. 

Web Title: sports news Kabaddi