कबड्डीत पाटणाची हॅटट्रिक

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

चेन्नई - चढाईचा ‘सुपरमॅन’ प्रदीप नरवालने बचावपटूंना आव्हान देत मोसमातील आणखी एक ‘सुपर टेन’ करत पाटणा पायरेट्‌सचे विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न साकार केले. पाचव्या मोसमाच्या अंतिम लढतीत पाटणा पायरेट्‌सने पदार्पणातच अंतिम फेरी गाठणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघावर ५४-३८ असा विजय मिळविला.

चेन्नई - चढाईचा ‘सुपरमॅन’ प्रदीप नरवालने बचावपटूंना आव्हान देत मोसमातील आणखी एक ‘सुपर टेन’ करत पाटणा पायरेट्‌सचे विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न साकार केले. पाचव्या मोसमाच्या अंतिम लढतीत पाटणा पायरेट्‌सने पदार्पणातच अंतिम फेरी गाठणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघावर ५४-३८ असा विजय मिळविला.

गुजरातचा भक्कम बचाव आणि पाटणाच्या प्रदीप, मोनू गोयतच्या चढाया असाच हा सामना होता. प्रदीपने क्षमतेच्या ५० टक्के जरी खेळ केला, तरी आम्ही जिंकू हे प्रशिक्षकांचे बोल प्रदीपने मैदानात ५० टक्‍क्‍यांहून अधिक खेळ करत खरे ठरवले. प्रदीप आणि मोनू या दोघांच्या चढाया सामन्यात निर्णायक ठरल्या. गुजरातच्या बचावपटूंना विशेषतः मिघानी आणि अत्राचली यांना आलेले

अपयश त्यांच्या पराभवाचे खरे कारण ठरले. प्रदीपने चढाईत १९ गुण मिळवून आपणच सर्वोत्तम असण्यावर शिक्कामोर्तब केले.

त्याहीपेक्षा बचावात त्यांच्या कोपरारक्षक जयदीपने केलेले ‘हाय फाईव्ह’ पाटणाच्या विजयात प्रदीपच्या यशाइतकेच मोलाचे ठरले. उत्तरार्धात गुजरातने महेंद्र राजपूत आणि पाठोपाठ चंद्रन रणजित दोघांना उतरवले; मात्र तिसऱ्याच मिनिटाला त्यांना लोण वाचवता आला नाही. त्यानंतर परवेझने पुन्हा एकदा प्रदीपची पकड केली; पण त्यांचा आधार असलेल्या फझल अत्राचली आणि अबोझर

मिघानी या कोपरारक्षकांचा संथपणा आणि मोक्‍याच्या वेळी केलेली घाई गुजरातला महागात पडली. त्यामुळे उत्तरार्धात त्यांना सहाव्या मिनिटाला आणखी एक लोण सहन करावा लागला. त्या वेळी पाटणाने ३८-२६ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा विजय जवळपास

निश्‍चित केला. गुजरातच्या चढाईपटूंनी त्यानंतर सामन्यात परतण्याचे कसोशीने प्रयत्न केले; पण विजेतेपदाची लढत खेळताना पाटणा संघाचे बचावपटूही प्रेरित झाले. त्यामुळे गुजरातच्या चढाया फोल ठरल्या. अखेरची तीन मिनिटे बाकी असताना ‘सुपर टेन’ करणारा सचिनही पकडला गेल्याने गुजरातचे मुसंडी मारण्याचे अवसानच गळून गेले. प्रदीपने पुन्हा एकदा सुपर टेनच्या पलीकडे जात सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना गुजरातवर तिसरा लोण दिला. हा लोण पाटणा संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणाराच ठरला.

पूर्वार्धाची सुरुवात अपेक्षित वेगवान झाली. गुजरात संघाच्या बचावपटूंनी आपली ताकद दाखवून देत पाचव्याच मिनिटाला पाटणा संघावर लोण दिला. त्यानंतर सचिनच्या चढाई गुजरातसाठी गुण वाढवू लागल्या. गुजरात दुसरा लोण देण्याच्या उंबरठ्यावर होते; मात्र त्या वेळी कोपरारक्षक अबोझल मिघानीची चूक झाली आणि पाटणा संघाला दिलासा मिळाला. मैदानात परतलेल्या मोनूने चढाईत फझलला टिपत गुजरातवर दडपण आणले. मध्यरक्षक परवेझ भैस्नवाल आणि सुनीलकुमारही मोनूच्या चढाईत अलगद सापडले. त्यामुळे प्रदीप मैदानात परतला. गुजरातकडे तीन खेळाडू असताना त्याने केलेली चढाई पूर्वार्धाचे चित्र पालटवण्यास निर्णायक ठरली. त्याला ‘सुपर टॅकल’ करण्याच्या नादात प्रदीपने तीनही गडी टिपले. विश्रांतीस पाच मिनिटे असताना त्यांनी लोण परतवला. त्यामुळे सामना १५-१० अशा स्थितीतून १५-१५ असा बरोबरीत आला. त्याहीपेक्षा पहिल्या १५ मिनिटांत केवळ एकच गुण मिळवू शकलेल्या प्रदीपचा आत्मविश्‍वास उंचावला आणि त्याने विश्रांतीला पाटणा संघाला पिछाडीवरून (२१-१८) असे आघाडीवर नेले होते.

Web Title: sports news Kabaddi patna