महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची अंतिम फेरीत धडक

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची अंतिम फेरीत धडक

हैदराबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या २८व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत पुरुष संघाची गाठ कोल्हापूर; तर महिलांची लढत कर्नाटकशी होईल.

महिला गटाच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने विदर्भाचे आव्हान सहज परतवून लावले. महाराष्ट्राच्या मुलींनी सामना एक डाव सात गुणांनी जिंकला. प्रथम संरक्षण करताना महाराष्ट्राची पहिली फळीच बाद करणे विदर्भाला जमले नाही. पहिल्या नऊ मिनिटांच्या डावातील ४.५० मिनिटे संरक्षण केल्यावर त्यांना केवळ कविता घाणेकर हिला बाद करण्यात यश आले. त्यानंतर ऐश्‍वर्या सावंत हिने ४.१० मिनिटे बचाव करून महाराष्ट्राची बाजू भक्कम केली. विदर्भाची संरक्षक फळी महाराष्ट्राच्या धारदार आक्रमणासमोर निष्फळ ठरली. महाराष्ट्राने त्यांचे बारा गडी टिपून पहिल्या डावात ११ गुणांची आघाडी घेतली. शीतल भोर हिने तब्बल सात गडी टिपले. दुसऱ्या डावात विदर्भाने महाराष्ट्राचे चार गडी टिपले; पण तेवढे पुरेसे नव्हते. दुसऱ्या उपांत्य लढतीत कर्नाटकने यजमान तेलंगणाचा पराभव केला. 

पुरुषांच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने केरळाचे आव्हान १३-११ असे सहा मिनिटे आणि दोन गुणांनी परतवून लावले. महाराष्ट्राच्या विजयात सुरेश सावंतच्या (२.४० मिनिटे आणि २ गुण) अष्टपैलू खेळाबरोबर महेश शिंदे (दोन्ही डावांत २.१० मिनिटे), गजानन शेंगाळ (२.२० मिनिटे) यांच्या सुरेख बचावाचा मोठा वाटा होता. दुसऱ्या लढतीत कोल्हापूरने तेलंगणाचा २ गुणांनी पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com