महाराष्ट्राचे सलग चौथे दुहेरी विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पुणे - महाराष्ट्राने पुरुष आणि महिला खो-खो संघांनी सलग चौथ्या वर्षी फेडरेशन करंडक स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी कोल्हापूर; तर महिलांनी कर्नाटकचा पराभव केला. 

पुणे - महाराष्ट्राने पुरुष आणि महिला खो-खो संघांनी सलग चौथ्या वर्षी फेडरेशन करंडक स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला. हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी कोल्हापूर; तर महिलांनी कर्नाटकचा पराभव केला. 

स्पर्धेवर महाराष्ट्राचेच निर्विवाद वर्चस्व राहिले. त्यांच्या प्रतीक वाईकर आणि प्रियंका भोपी यांची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. पुरुषांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी कर्नाटकाचे आव्हान २२-१७ असे ५; तर महिलांनी कर्नाटकचे तगडे आव्हान १५-६ असे नऊ गुणांनी परतवून लावले.
कर्नाटकने प्रथम संरक्षण करणे पसंत केले. मात्र, त्यांचा हा निर्णय साफ चुकला. महाराष्ट्राच्या धारदार आक्रमणाने त्यांनी सात गुण गमावले.

तुलनेत महाराष्ट्राने बचाव भक्कम ठेवताना केवळ चारच गुण गमावून विश्रांतीला ३ गुणांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आक्रमकांनी छाप पाडताना ८ गुणांची कमाई करून कर्नाटकसमोर विजयासाठी १२ गुणांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावातही महाराष्ट्राचा बचाव भक्कम राहिला. कर्नाटकला केवळ दोनच गुण मिळवता आल्याने त्यांना ९ गुणांनी पराभव पत्करावा लागला. प्रियंका (३.१० मिनीट, ४.१० मिनीट आणि २ गडी) आणि ऐश्‍वर्या (२.२० मिनीट, ३.१० मिनीट आणि २ गडी) यांचा अष्टपैलू खेळ महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरला. आक्रमणात काजल भोरने ५ गडी टिपून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला कोल्हापूरने कडवा प्रतिकार केला. महाराष्ट्राकडे पहिल्या डावात केवळ दोनच गुणांची आघाडी होती. दुसऱ्या डावात बारा गुणांची कमाई करून त्यांनी कोल्हापूरसमोर १५ गुणांचे आव्हान ठेवले होते. त्यांना प्रयत्नांची शिकस्त करूनही नऊ गुणच मिळवता आल्याने त्यांना पाच गुणांनी पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक
सर्वोत्कृष्ट संरक्षक - एम. वीणा (कर्नाटक), महेश शिंदे (महाराष्ट्र), सर्वोत्कृष्ट आक्रमक - काजल भोर (महाराष्ट्र), उमेश सातपुते (कोल्हापूर). सर्वोत्कृष्ट अष्टपैलू - प्रतीक वाईकर, प्रियंका भोपी (दोघी महाराष्ट्र)

Web Title: sports news kho-kho federation karandak competition