एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे दुहेरी मनसबदार!

एव्हरेस्टवीर किशोर धनकुडे दुहेरी मनसबदार!

पुणे - यंदा प्रतिकूल हवामानामुळे साउथ कोलवरून रिकाम्या हाताने आणि निराशेने परतण्यासाठी मनाची तयारी करीत होतो. साउथ कोलला जेमतेम तासभर ऑक्‍सिजन लावून दुसऱ्या दिवशी बेस कॅंपवर परतायचे ठरले होते. अशावेळी शेर्पा आले. त्यांनी हवामान सुधारल्याचे सांगतानाच समिट अटेंप्टकरिता सज्ज होण्याची सूचना दिली. त्यानंतर दहा तासांत एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा पाऊल टाकले तेव्हा क्षितिज पूर्ण पाहता आले, अशी प्रतिक्रिया किशोर धनकुडे याने व्यक्त केली.

किशोरने २०१४ मध्ये तिबेटच्या बाजूने; तर यंदा नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट दोन्ही बाजूंनी सर करण्याची दुर्मिळ कामगिरी नोंदविलेला तो महाराष्ट्राचा पहिलाच गिर्यारोहक ठरला. पुण्यात परतलेल्या किशोरची भेट घेतली असता तो म्हणाला की, १५ मे रोजी बेस कॅंपवरून कॅंप २ गाठला. त्या रात्री व १६ मे रोजी तेथे राहिलो. १७ मे रोजी कॅंप ३ला मुक्काम केला. १८ मे रोजी संध्याकाळी साउथ कोलला पोचलो. त्याच रात्री समिट अटेंप्टला निघायचे होते; पण वारा खूप होता. त्यामुळे वर आणि खालीसुद्धा जाता येणार नव्हते. जोरदार वाऱ्याचा व्हिडिओ घेतला. दुपारी बारा वाजता जेवण केले. ते पचावे म्हणून तासभर ऑक्‍सिजन सिलिंडर ०.५वर लावला. रात्री नऊच्या सुमारास शेर्पा आले. त्यांनी सज्ज राहण्यास सांगितले. हे म्हणजे लॉटरी लागल्यासारखेच होते.

दुसऱ्यांदा एव्हरेस्टवर पाऊल टाकले तेव्हा काय वाटले, या प्रश्नावर तो म्हणाला की, दोन्ही बाजूंनी एव्हरेस्ट करू शकलो, याचा फार आनंद झाला. २०१४ मध्ये ढगाळ हवेमुळे फार लांबचे पाहता आले नव्हते. या वेळी सगळा नजारा डोळ्यांत साठवून ठेवला. संपूर्ण क्षितिज पाहू शकलो आणि ही भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. तेव्हा मकालू, ल्होत्से ही शिखरे दिसली नव्हती. ती या वेळी व्यवस्थित दिसली. तिबेटच्या बाजूचा मार्गसुद्धा मी व्यवस्थित पाहू शकलो.

२०१४ मधील यशानंतर किशोरने नेपाळच्या बाजूने चढाई करायचे ठरविले. २०१५ मध्येच त्याने ही मोहीम आखली होती, पण त्या वेळी भूकंपामुळे अडथळा आला. त्याविषयी तो म्हणाला की, तेव्हा मी कॅंप २ पर्यंत गेलो होतो. तेथून खाली येऊन बेस कॅंपला ब्रेकफास्ट करायचा होता. त्याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास भूकंप झाला. त्यामुळे एव्हरेस्ट मोहिमा रद्द झाल्या. बेस कॅंप सोडताना मी खचलो होतो. आपण एकदा एव्हरेस्टवर गेलो होतो, परत यायची काय गरज होती, असा विचारही मनात आला होता.

श्री श्री रविशंकर अन्‌ शिवाजी महाराज
यशस्वी चढाईत दोन्ही वेळा एव्हरेस्टवर काय केले, याविषयी किशोर म्हणाला की, मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा अनुयायी आहे. तेव्हा मी श्री श्री रविशंकर यांचा फोटो ठेवून नमस्कार केला होता. या वेळी मी शिवाजी महाराजांचा फोटो जवळ ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com